अंबरनाथ-बदलापूर रेल्वे पायवाट बंद

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे पायवाट बंद

Published on

अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मोरीवली गाव आणि निसर्ग ग्रीन परिसरातील पायवाट रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. या पायवाटीवर रोज ये-जा करणाऱ्या सुमारे दहा हजार नागरिकांचा मार्ग आता बंद झाला आहे. परिणामी त्यांना आठ ते दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून दररोज शंभर रुपये खर्च करून प्रवास करावा लागत आहे.
रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना मोरीवली गाव व निसर्ग ग्रीन वसलेले आहेत. या आधी लोक ३० पावलांच्या अंतरावर असलेल्या पायवाटेने पूर्व-पश्चिम प्रवास करत होते. हा मार्ग मोरीवलीसह बुवापाडा, भास्करनगर, मेटलनगर, लादी नाका, भेंडीपाडा, खुंटीवली, गणेशनगर या परिसरातील रहिवाशांसाठी शिक्षण, कामधंदा, बाजारहाट आणि रुग्णसेवा यासाठी सर्वात सोयीचा होता. रेल्वेने हा मार्ग भिंत बांधून बंद केल्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम तीन पटीने वाया जात आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिवसाला १०० रुपयांपेक्षा जास्त प्रवास खर्च करावा लागतो. ज्यामुळे महिन्याचा गाडीखर्च दोन ते अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त होतो. मोलमजुरी करणारे, घरकाम करणाऱ्या महिला, एमआयडीसीत काम करणारा वर्ग मोठ्या संख्येने तुटपुंज्या पगारात काम करतो. अशा परिस्थितीत प्रवासखर्च भरणे, मुलांचा शिक्षण खर्च व घरखर्च सांभाळणे हे मोठे आव्हान बनले आहे.

पादचारी पुलासाठी स्वाक्षरी मोहीम
चार दिवसांपूर्वी पायवाट बंद झाल्याने विद्यार्थी, कामगार आणि इतर नागरिकांचे हाल झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना शाळा बदलावी लागली तर काहींनी मुलांच्या क्लासेसही बंद केले. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व काही सामाजिक संस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे. गुरुनाथ गायकर प्रतिष्ठानतर्फे आठ ते दहा हजार नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवून ही मागणी लवकरच रेल्वेकडे पाठवली जाणार आहे. नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत ही मोहीम राबवली जाईल आणि नागरिकांच्या तक्रारी सरकार दरबारी मांडल्या जातील. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुनाथ पांगुळ गायकर, संदीप गायकर, सचिन चव्हाण, शिवदास गायकर, श्रीकांत पवार, संतोष ठाकरे, रामदास गायकर यांच्यासह हजारो महिला-पुरुष उपस्थित होते. त्यांनी सुरक्षित भुयारी मार्ग, पादचारी पुलाची मागणी करून पंतप्रधान, मुख्यमंत्री, मध्य रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदेपर्यंत निवेदन पोहचवण्याचे ठरवले.

माझी मुलगी निसर्गग्रीन परिसरातील आर्याग्रीन शाळेत शिकत आहे. तिचा क्लासही तिथेच आहे. मात्र आता मार्ग बंद झाल्याने तिला येणे-जाणे कठीण झाले. लहान मुलगी ही तिथेच शाळेत होती; मात्र मागच्या वर्षी मार्ग बंद केल्याने तिची शाळा बंद करावी लागली. मोठी मुलगी नववीत शिकत आहे. पुढे दहावी असल्याने तिचे शिक्षण बंद करू शकत नाही. दोन दिवसांपूर्वी माझे वडील मोठ्या मुलीला सोडवायला गेले असता ते पडले आणि रक्तबंबाळ झाले. ते ७८ वर्षांचे आहेत. हा मार्ग बंद झाल्याने मोठी समस्या उभी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे तत्काळ पादचारी पूल उभारावा.
- मीना दिवटे, महिला ग्रामस्थ

आमची पलीकडे वडापावची हातगाडी आहे. जेमतेम कमाई होते. मी धुणीभांड्यांची काम करते. रोज १०० रुपये गाडीभाडा परवडत नाही. मार्ग बंद झाल्याने कामच बंद झाले. आता आम्ही करायचे काय?
- पार्वती चव्हाण, महिला ग्रामस्थ

अंबरनाथ : पादचारी पुलासाठी गुरुनाथ गायकर प्रतिष्ठानतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com