दसऱ्याआधी राजकीय उलथापालथ
दसऱ्याआधी राजकीय उलथापालथ
निवडणुकाआधी पक्षांतराचे रायगडमध्ये वारे
खालापूर, ता. २४ (बातमीदार) ः तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नोव्हेंबरमध्ये होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार थेट पद्धतीने निवडला जाणार असल्याने अनेक जण कारभारी होण्याचे स्वप्न पाहात आहेत. अशात निवडणुकांआधी रायगडमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहे. आगामी काळात तिकिटासाठी पक्ष बदलाची लाट येणार आहे.
--------------
नगरध्यक्षपदाच्या रिंगणात गटबाजीचे वादळ
खालापूर (बातमीदार) : खोपोलीत अजित पवार गट, शिंदे सेना, भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे; परंतु अजित पवार गट आणि शिंदे सेनेत विळ्याभोपळ्याचे नाते असल्याने निवडणुकीत दोघे आमनेसामने असणार हे निश्चित झाले आहे. या दोन्ही पक्षांतून थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक आहेत. शिंदे सेनेकडे थेट नगराध्यक्षपदासाठी पाचपेक्षा अधिक जण शर्यतीत आहेत. परंतु पक्षात वाढत्या दावेदारीमुळे सोडचिठ्ठी देण्याचा सिलसिला सुरू झाला आहे.
थेट नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असलेले माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना आमदारकीच्या खुर्चीपर्यंत नेण्यास मोठी मदत केली होती; परंतु काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटातून कुलदीप शेंडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करीत सुनील पाटील यांच्या दावेदारीला हादरा दिला. यामुळे सुनील पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करीत राजकीय पक्ष बदलाचे वर्तुळ पूर्ण केले. भाजपमध्येदेखील अशाच प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. भाजपाच्या अश्विनी पाटील यांनीदेखील नव्याने आलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
------------------------
खोपोलीत आमदार थोरवे यांना मोठा धक्का
खोपोली, ता. २४ (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्ताने रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व कर्जत-खालापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे यांचा कर्जत येथील पोलिस मैदानात सत्काराचा कार्यक्रम खासदार प्रफुल्ल पटेल व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने खोपोलीतील अनेक मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
माजी नगरसेविका अनिता शहा, खोपोली भाजपचे शहराध्यक्ष राहुल गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व सुनील तटकरे यांनी शिंदे गट, महेंद्र थोरवे, भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना दिलेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
****************
श्रीवर्धन मनसे तालुका अध्यक्षाचा राजीनामा
श्रीवर्धन (बातमीदार) : मनसेचे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष सुशांत पाटील यांनी आपल्या पदाचा व संघटनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्राद्वारे आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
सुशांत पाटील हे तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने अनेक उपक्रम आणि आंदोलने राबविली होती. परंतु सध्याचे बदलते राजकारण, मतदारांच्या बदललेल्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य होत नव्हते. एकूण मतदारांचे राजकीय गणित जुळवून आणण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता होत नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्यात स्थानिक नेतृत्वाबाबत असंतोष व्यक्त केला असून, संघटनेतील अनेक सैनिक संशयाच्या वातावरणात काम करीत असल्याचे नमूद केले आहे.
उद्या कदाचित माझे राजकीय व्यासपीठ जरी बदलले तरी राज ठाकरे यांचे भविष्यातील मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावरून सुशांत पाटील यांनी पक्षबदलाचे संकेत दिले आहेत.
------------------------------
वैभव खेडेकर, सुबोध जाधव यांचा भाजपात प्रवेश
माणगाव (वार्ताहर) ः मनसेला कोकण आणि रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. तळकोकण आणि रायगड जिल्ह्यातून मनसे या राज ठाकरे यांच्या पक्षाची मोठी पडझड झाल्याचे दिसत आहे.
मनसे पक्षाची स्थापना झाल्यापासून तळकोकणातून खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि मनसेचे रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातून बडतर्फ केले. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. अशात वैभव खेडेकर अणि सुबोध जाधव यांनी मंगळवारी (ता. २३) मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.
वैभव खेडेकर म्हणाले की, मी मनसे पक्षाच्या स्थापनेपासून काम करीत असून मनसेचे रोपटे मी कोकणात रोवले, परंतु आता फळे येण्याची वेळ आली असता मला पक्षातून बडतर्फ केले. मी ३५ वर्षे राज ठाकरे यांच्याबरोबर काम केले असून, आता भाजप पक्षात जात आहे. कोकणात भाजप शत प्रतिशत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा विकास असो किंवा कोकणचा विकास भाजप पक्षाशिवाय पर्याय नाही. रायगड व श्रीवर्धनचा विकास हा फक्त भाजप पक्ष करू शकतो, असे सुबोध जाधव यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.