‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अंतर्गत जात वैधता मोहिमेचे आयोजन
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अंतर्गत जात वैधता मोहिमेचे आयोजन
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगरतर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबवली जाणार आहे.
या काळात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील समान संधी केंद्र प्रमुखांचा वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी समितीकडे अर्ज सादर केलेले आहेत; पण अर्जामध्ये काही त्रुटी असल्याने प्रमाणपत्र प्रक्रियेत अडथळा येत आहे, अशा विद्यार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी विशेष त्रुटी पूर्तता शिबिरे भरविण्यात येणार आहेत. तसेच अकरावी-बारावी विज्ञान शाखेत शिकणारे तसेच सीईटी, नेट, जेईई व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी बसणारे विद्यार्थीही जात वैधता प्रमाणपत्रासाठी विहित मुदतीत अर्ज करू शकतील. यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संकेतस्थळावर https://bartievalidity.maharashtra.gov.in ऑनलाइन अर्ज सादर करून पुढील कार्यवाहीसाठी समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले, उपायुक्त कैलास आढे तसेच सदस्य सचिव विलास परब यांनी केले आहे.