रायगडात बैल चोरीच्या घटना थांबणार कधी?

रायगडात बैल चोरीच्या घटना थांबणार कधी?

Published on

रायगडात बैल चोरीचे सत्र
आदिवासी पाड्यावर पुन्हा एकदा जनावर चोरीची घटना
कर्जत, ता. २४ (बातमीदार) ः तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायतीमधील चिंचवाडी या आदिवासी पाड्यावर पुन्हा एकदा जनावर चोरीची घटना घडली आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात संपूर्ण तालुका रमला असताना सोमवारी (ता. २२) चोरट्यांनी आदिवासी शेतकरी गणेश विठ्ठल पारधी यांच्या घरातून बैलजोडी चोरून नेली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चार जणांच्या टोळीने मारुती स्विफ्टसदृश गाडीतून येऊन बैलांना भूल देण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला आणि त्यांना गाडीतून पळवून नेले. वाडीतील काहींना संशय आल्यावर गावकऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरटे चपळाईने पसार झाले. या घटनेचा काही भाग एका तरुणाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. घटनेनंतर दौलत पारधी, गणेश पारधी, काळू निरगुडा व इतर ग्रामस्थांनी तत्काळ कळंब पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.
आदिवासी शेतकरी कुटुंबासाठी बैल हे फक्त जनावर नसून, शेतीचे प्रमुख साधन आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेती धोक्यात असताना अशा चोरीमुळे गरीब शेतकऱ्यांचे नुकसान दुप्पट होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. पूर्वी ग्रामीण भागात नियमित पोलिस पेट्रोलिंग होत असल्याने अशा घटना कमी प्रमाणात घडत असत. मात्र सध्या पेट्रोलिंग बंद असल्याने चोरट्यांचे धैर्य वाढले असून, त्यांना मोकळे रान मिळाले आहे.

दरवर्षी २० ते २५ बैल चोरीला
गेल्या सात-आठ वर्षांत चिंचवाडी परिसरात दरवर्षी तब्बल २० ते २५ बैल चोरीला गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तरीदेखील प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. ही समस्या केवळ चिंचवाडीपुरती मर्यादित नसून, रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सातत्याने जाणवत आहे.

जनआंदोलन उभारणार
चोरांना पोलिसांची भीतीच उरलेली नाही. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर अशा घटना वाढतच जातील. चोरट्यांना गजाआड करून नियमित पेट्रोलिंग सुरू करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com