मेडिकलच्या दुकानातून सव्वाआठ लाखांची चोरी
मेडिकलच्या दुकानातून सव्वाआठ लाखांची चोरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : मेडिकलमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या शिवानंद साहू (२३) आणि सूरज सिंग (२३) या दोघांनी मेडिकलच्या गळ्यातून आठ लाख ३० हजारांची चोरी केल्याचा संशय मेडिकल व्यावसायिकांनी केला आहे. याप्रकरणी त्या दोघांविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ज्योती कातकाडे (५४) यांचे मागील दीड वर्षापासून लाइफकेअर अनेक्स केमिस्ट अँड इग्रीस्ट नावाचे मेडिकल शॉप हे सोहम प्लाझा, घोडबंदर रोड येथे आहे. या मेडिकलमध्ये त्या आणि त्यांना मदतनीस म्हणून साहू आणि सिंग हे दोघे काम करतात. तसेच त्यांचे पती ज्ञानेश्वर हे दररोज झालेले रोख व्यवहाराचे पैसे बँकेमध्ये जाऊन जमा करतात. २१ सप्टेंबर रोजी हिशेब करीत असताना जेवढ्या पैशांच्या औषधांची विक्री होत आहे तेवढी रक्कम मेडिकलच्या गल्ल्यात जमा होत नसल्याची बाब तक्रारदाराच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी हिशेब केल्यावर ७ एप्रिल ते २१ सप्टेंबर २०२५दरम्यान मेडिकलच्या गल्ल्यातून आठ लाख ३० हजार रुपये चोरीला गेल्याची बाब समोर आली. ही रक्कम मदतनीस असलेल्या दोघांनी चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीनुसार त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.