विस्कटलेले संसार जुळवणारी खाकीतील ''चेतना''
विस्कटलेले संसार जुळवणारी खाकीतील ‘चेतना’
राजीव डाके, सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, २५ : लग्न आणि मूल झाल्यानंतर मुलींना करिअर घडवणे कठीण होते, असा समज प्रचंड आहे; मात्र ठाणे येथील चेतना धनराज चौधरी यांनी हा गैरसमज पुसून टाकला आहे. त्यांनी केवळ स्वतःचे करिअर उंचावले नाही, तर इतर मुलींसाठीही आदर्श निर्माण केला आहे. चेतना यांनी लहान बाळाला सोबत घेऊन पोलिस प्रशिक्षण घेतले आणि आता त्या पोलिस अधिकारी म्हणून गुन्हे शाखेत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांनी खाकी गणवेशाचा आदर आणि स्वप्न मोठ्या जिद्दीने साकार केले आहे.
गुन्हेगारीचे स्वरूप सध्या खूप बदलले आहे. सायबर गुन्हे वाढत आहेत, तर खून, दरोडा अशा गुन्ह्यांची घटनादेखील कायम आहे. याशिवाय कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढत आहेत. जुन्या अमानवी पद्धतीत सुनेवर राॅकेल ओतून हुंडा घेतल्याचे प्रकार कमी झाले असले तरी आधुनिक पद्धतीने हुंडा देणे-घेणे सुरू आहे. छोट्या कारणांनी घटस्फोटांची संख्या वाढली आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे पोलिसांना या प्रकरणांवर काम करण्यासाठी विशेष भरोसा कक्ष स्थापन करावा लागला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत ठाणे, भिवंडी, उल्हासनगर व कल्याण तालुक्यात भरोसा कक्ष चालू आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून चेतना चौधरी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आलेल्या कौटुंबिक वाद व हिंसाचाराच्या तक्रारी हाताळत त्यांनी अनेक विस्कटलेल्या संसारांना पुन्हा जुळवण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षभरात ५९९ पेक्षा अधिक जोडप्यांना विश्वासातून एकत्र आणण्यात या कक्षाने यश मिळवले आहे. चेतना स्वतः तक्रारीसाठी येणाऱ्या पती-पत्नीशी संवाद साधतात, त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून समुपदेशन करतात आणि विस्कटलेल्या संसारात पुन्हा आत्मविश्वास व समजूतदारपणा निर्माण करतात. तसेच ज्या मुली-मुलांना लग्नानंतर करिअर करण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी स्वतःचे उदाहरण देऊन आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात.
मुलांच्या वाढदिवसांसह कुटुंबाची जबाबदारी मुलींवर खूप येते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेण्यासाठी मुलींना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे मुली आत्मविश्वास गमावतात, पण चेतना यांनी लग्नानंतरही, मूल असतानाही पोलिस सेवा सुरू ठेवण्याचे ध्येय ठरवले. अनेक अडचणी जिद्दीने पार केल्या. लेखी, तोंडी आणि मैदानी परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांनी पोलिस अधिकारीपद मिळवले. या त्यांच्या यात्रेतील सर्वात मोठा आधार म्हणजे सासरकडून मिळालेली साथ, जी चेतनासाठी मोलाची ठरली. त्यांनी ठामपणे मानले आहे की जेव्हा आपण ध्येय निश्चित करतो आणि ते कुटुंबासमोर मांडतो, तेव्हा कुटुंबाची साथ नक्की मिळते. त्यामुळे कुटुंब आणि कुटुंबपद्धतीची जपणूक करणे फार गरजेचे आहे.
पोलिस यंत्रणेत प्रेरणादायी
चेतना यांनी घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या किंवा एकमेकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या जोडप्यांना समजावून, क्षुल्लक कारणांमुळे तुटलेल्या संसारांना पुन्हा जुळवण्याचे काम केले आहे. त्या संसारांमध्ये सुख-शांती परत आणून एकत्र राहण्याचा आत्मा जागृत करतात. कौटुंबिक वाद मिटवण्याबरोबरच सायबर गुन्हेगारी, हिंसाचार आणि दरोड्यांसारख्या गुन्ह्यांवर लढताना चेतना चौधरी ठाणे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनल्या आहेत. त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने, आत्मविश्वासाने व जिद्दीने अनेक अडथळे पार केले असून, त्यांनी दाखवलेले धैर्य इतर स्त्रियांसाठी एक मोठे उदाहरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.