वसई अर्नाळा राज्य मार्ग गेला खड्यात
वसई-अर्नाळा राज्यमार्ग खड्ड्यात
नागरिकांतून संताप; रास्ता रोकोचा पावित्रा
वसई, ता. २५ (बातमीदार) ः वसई-विरार शहरासह गावातील रस्त्याची चाळण झाली आहे, परंतु दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास असुरक्षित झाला आहे. वसई ते अर्नाळा हा राज्यमार्ग असताना येथील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्घटनेला निमंत्रण मिळत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
वसई ते अर्नाळा हा राज्यमार्ग असून, या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. शाळकरी बसेस, शेतकरी, व्यावसायिक, चाकरमानी यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असतात. यासोबतच समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो, मात्र या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे.
रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने होत आहे, परंतु अद्याप याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मनस्ताप वाढू लागला आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा या मार्गावर अपघात झाले आहेत. विद्यार्थी, पालकदेखील जखमी झाले असून, एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला असून, खड्डे बुजवू नका, तर नवीन टिकावू रस्ते तयार करा, अशी मागणी होऊ लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाघोली येथे पॅचवर्क मंगळवारी करण्यात आले, मात्र आम्हाला खड्डे दुरुस्ती नको, तर संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण हवे आहे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
- समीर सुभाष वर्तक, काँग्रेस नेते
---------------
वसई : राज्यमार्गावरील खड्यातून सुरू असलेला प्रवास.