थोडक्यात बातम्या रायगड
एमडीएन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मैदानी स्पर्धा उत्साहात
रोहा (बातमीदार) : एमडीएन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू व शाळेचे हेड ॲडमिन देवेंद्र चांदगावकर यांच्या हस्ते झाले. प्राचार्या योगिनी देशमुख, तालुका क्रीडा समन्वयक रवींद्र कान्हेकर, सहसमन्वयक सुधीर जंगम, क्रीडा प्रशिक्षक गणेश म्हस्के यांच्यासह शिक्षक, व्यवस्थापक व मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील सुमारे ९०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. १०० ते ३००० मीटर धावणे, ५ हजार मीटर चालणे, लांब व उंच उडी, थाळी फेक, गोळाफेक, ट्रिपल जम्प, हॅमर थ्रो, भाला फेक तसेच रिले अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. दिवसभर शेकडो विद्यार्थी मैदानात जोमाने सहभागी होताना दिसले. तालुक्यातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एमडीएन इंटरनॅशनल स्कूलने विशेष योगदान दिले. संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे यांनी विजेत्या खेळाडूंना पुढील पातळीवरील यशासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
...............
येरळ केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात
रोहा (बातमीदार) : येरळ केंद्राची सप्टेंबरमधील शिक्षण परिषद खरबाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडली. केंद्रप्रमुख प्रशांत वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर सखोल चर्चा झाली. बुधवंत व जाधव शिक्षिका यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या कवितांना सुश्राव्य चाली लावणे, या विषयावर मार्गदर्शन केले. पंचायत राज समिती व आगामी पीआरसी दौऱ्याबाबत आंबिवली शाळेचे मुख्याध्यापक बादल जाधव यांनी शिक्षकांना माहिती दिली. विठ्ठलवाडी शाळेचे मुख्याध्यापक नागेश सुतार यांनी पहिलीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे परीक्षण सादर केले. केंद्रप्रमुख वाघचौरे यांनी प्रशासकीय सूचना देऊन शिक्षकांना शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल राठोड यांनी केले तर आभार बागुल यांनी मानले. येरळ केंद्रातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
......................
आदर्श शिक्षिका उल्का माडेकर यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
तळा (बातमीदार) : तळा तालुक्यातील गौळवाडी-काकडशेत शाळेच्या मुख्याध्यापिका उल्का उमाजी माडेकर यांना यंदाचा तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थ व शिक्षकांनी त्यांचा सत्कार करून सन्मान केला. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व महावस्त्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. बोरघर-हवेली केंद्रातील विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक सादरीकरण करून माडेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मनवर, खुळपे, यशवंत मोंढे यांच्यासह शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष केशव शिंदे, पांडुरंग शिंदे, श्रीरंग खेडेकर यांच्यासह मान्यवरांनी माडेकर यांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील मुलांचे शैक्षणिक व वैयक्तिक घडविण्यासाठी त्यांचे योगदान लक्षणीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
...........
नांदगाव कोळीवाड्यातील मच्छिमार महिलांना जाळी विणण्याचे प्रशिक्षण
मुरूड (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नांदगाव कोळीवाड्यातील मच्छिमार महिलांना जाळी विणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या उपक्रमात ४० महिला सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी हे काम प्रामुख्याने पुरुष वर्ग करत असले तरी आता महिलाही आत्मनिर्भर व्हाव्यात, हा उद्देश प्रशिक्षणामागे होता. सरपंच सेजल घुमकर यांनी महिलांना प्रोत्साहन देत स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. उपसरपंच मेघा मापगावकर, ग्रामसेवक प्रमोद म्हात्रे, माजी उपसरपंच अस्लम हलडे, सदस्य नितेश रावजी, विक्रांत कुबल यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार व उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार असून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होणार आहे.
..............
तळा शहरात देवी चंडिका मातेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात
तळा (बातमीदार) : शहराची ग्रामदेवता चंडिका माता मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात सुरू झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेला झालेल्या घटस्थापनेपासून ते विजया दशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंपरेनुसार घटस्थापनेचे कार्य उपाध्ये वतनदारांकडून केले गेले. विविध वतनदारांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कुंभाराने घटासाठी माती, बुरुडाने परडी, वाण्यांनी धान्य, पोतदारांनी माळा तर नाभिकाने आरसा मंदिरात आणला. देवीच्या दागिन्यांची देखभाल गुरव करतात. दहा दिवस दररोज देवीची नवी साडी व अलंकारांनी सजावट केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरत्या, भजन-जागरण कार्यक्रमाचे आयोजन विविध वाड्यांच्या जबाबदारीनुसार होत आहे. नवमीपर्यंत संपूर्ण शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण असते.
................
भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीसपदी प्रवीण पाटील
पेण (बातमीदार) : भाजप युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीसपदी प्रवीण मारुती पाटील यांची निवड झाली आहे. पेण येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात सक्रिय भूमिका मिळत आहे. जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील, जि. प. सदस्य डी. बी. पाटील, पाली नगराध्यक्ष पराग मेहता यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाटील यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पेण मंडळ तालुकाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे व हमरापुर मंडळ तालुकाध्यक्ष विवेक म्हात्रे यांची फेरनिवड करण्यात आली. या नियुक्त्या व फेरनिवडीमुळे पक्ष संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
.............
जिल्ह्यात महाश्रमदान अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
अलिबाग (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ या उपक्रमांतर्गत सकाळी ८ ते १० या वेळेत महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली. गावागावात सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, नदी-समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, युवक मंडळे, एनएसएस स्वयंसेवक व विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. जमा झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच वृक्षारोपण, बागांचे सुशोभीकरण आणि सामुदायिक स्वच्छतेची शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबर रोजी शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम होणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
...............
पेणमध्ये सीएफआय संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
पेण (वार्ताहर) : उत्कर्ष नगर येथे सीएफआय संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील व आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, संस्थेचे अध्यक्ष संदेश म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. धैर्यशील पाटील यांनी सीएफआय संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आमदार रवि पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी संस्थेचे योगदान अधोरेखित केले. संस्थेच्या मदतीने घडविलेले अनेक विद्यार्थी उच्च स्तरावर पोहोचल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. देशमुख यांनी आगामी काळात आणखी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
..............
प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
रोहा (बातमीदार) : कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. देशमुख हे गेली १५ वर्षे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत असून १४ संशोधन निबंध, १६ पेटंट व ४ पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. याआधी त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरही पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या वर्षी जिल्हास्तरीय सन्मान मिळाला. तटकरे ट्रस्टचे अध्यक्ष संदीप तटकरे, रजिस्ट्रार अजित तेलंगे, सचिव प्रकाश सरकले यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा आदर्श कार्यप्रवण दृष्टिकोन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे सर्वांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.