संवेदनशील भागात ड्रोनच्या घिरट्या
संवेदनशील भागात ड्रोनच्या घिरट्या
सुरक्षेचा आढावा घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील अतिसंवेदनशील भागात सध्या ड्रोनच्या घिरट्यांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण केला आहे. कोकण सागरी किनारपट्टीजवळ असलेल्या या भागात, विशेषतः ग्रामीण भागात, अनधिकृतपणे ड्रोन उडवून व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जात असल्याचे समोर आले आहे. या ड्रोनच्या वापरामुळे स्थानिक प्रशासनासह केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांना मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुरक्षा दृष्टीने बंदी असलेल्या या परिसरात, यूट्युबर्स आणि इतर लोक परवानगीशिवाय ड्रोन उडवून व्हिडिओ बनवत आहेत; मात्र तपास यंत्रणा आणि पोलिस प्रशासनाकडून या घटनांकडे योग्य ते लक्ष दिले जात नाही, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कमजोर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेषतः श्री मलंगगड भागातील नेवाळी, चिंचवली परिसरात असलेल्या बीएआरसी कंपनीजवळ तसेच डोंगराळ भागांमध्ये ड्रोन उडवण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्र, भारतीय वायुसेनेची प्रयोगशाळा, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि महत्त्वाच्या शहरांपासून जवळ असलेल्या रेल्वेस्थानकांसह अनेक संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या भागातील सुरक्षा बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
अंबरनाथ व ठाणे तालुक्यातील नागरीकरण झपाट्याने वाढले असून, अनधिकृत चाळींची निर्मितीही तितकीच वाढली आहे. यामुळे या भागात अमली पदार्थांची विक्री, दहशतवाद्यांची हालचाल, तसेच अन्य गुन्हेगारी वाढल्याने सुरक्षा प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत. पोलिस यंत्रणेतील मनुष्यबळाचा तुटवडा आणि पोलिस ठाण्यांच्या विभाजनातील अडचणींमुळे प्रशासनाच्या हातात सुरक्षा व्यवस्था हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा सुरक्षिततेवरचा विश्वास कमी होत आहे.
सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक तसेच राजकीय पक्षांनी या गंभीर सुरक्षेच्या समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने सुरक्षा आढावा घेण्याची मागणी केली आहे. मनसेचे उपतालुका अध्यक्ष हेमंत मढवी आणि भूमिपुत्र धर्माभिमानी संघानेदेखील यावर जोरदार दबाव टाकत प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
बैठकीकडे लक्ष
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, ठाणे तालुक्यात सुरू वाढते नागरीकरण व त्यासोबत सातत्याने सुरू असलेल्या अमली पदार्थविक्रीच्या कारवाया, पोलिस ठाण्याच्या विभाजनाचे प्रश्न आदी विषयांवर तातडीने जिल्ह्यातील तालुक्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मनसेचे उपतालुका अध्यक्ष हेमंत मढवी, भूमिपुत्र धर्माभिमानी संघ, ठाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कधी बैठक घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.