स्वयंरोजगाराकडे ‘लक्ष्मी’ची पावले
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २५ : नवरात्र उत्सवात देवीचा जागर सुरू आहे. अशातच घराची जबाबदारी, आर्थिक ताळमेळ राखणे यासह अनेक आव्हानांचा सामना करणारी महिला बाहेरच्या जगातदेखील आपली किमया दाखवत आहे. त्यासाठी कष्ट करून संसाराचा गाडा हाकत आहेत. वसई-विरारमधील हजारो महिला एकत्र येत आपआपल्या घरच्या ‘लक्ष्मी’ होत आहेत. त्या उद्योग आणि रोजगारातून आपले पंख विस्तारत आहेत, हे विशेष म्हणावे लागेल. त्याकरिता महापालिका प्रशासन महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम आणि उद्योगाला चालना देत आहेत.
वसई-विरार महापालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजनेतून अनेक महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी अनुदान, कर्ज, प्रशिक्षण, कार्यशाळा, व्यवसायासाठी मार्गदर्शन दिले जात आहे, अशी माहिती दीनदयाल अंत्योदय योजनेच्या शहर व्यवस्थापिका रुपाली कदम यांनी दिली. अगरबत्ती, मेणबत्ती, विविध प्रकारचे मसाले, सणासुदीच्या काळात लागणारे खाद्यपदार्थ, कापडी पिशव्या तयार करणे, टेलरिंग, पर्यावरणपूरक वस्तू, कपडे विक्री यासह विविध प्रकारचा रोजगार करू लागल्या आहेत, तर उद्योग क्षेत्रातदेखील महिला पुढाकार घेत असून, त्यांच्यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला आहे.
पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेतून फिरता निधी ही योजना २०३० पर्यंत असणार आहे. तसेच भरारी शहर स्तर आणि बँकेच्या करारनाम्यातून दोन टक्के भांडवल मिळू लागले आहे, तसेच ऑनलाइन वस्तू विक्रीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महिलांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत जाऊ शकते, जेणेकरून या महिलांना स्वयंरोजगार व व्यवसायाला अधिकाधिक चालना मिळू शकणार आहे.
पर्यावरणपूरक व्यवसाय
छोटे-मोठे व्यवसाय करताना पर्यावरणाला आपला हातभार लागावा, यासाठी महिला बचत गट पुढे येत आहेत. यंदा गणेशोत्सवात एकूण नऊ हजार १३५ किलो निर्माल्य झाले. त्यातून महिला खतनिर्मिती करत आहेत. त्यामुळे किमान ५०० किलो खत तयार होणार आहे. ते ४० रुपये किलो विक्री करून त्यातून पर्यावरणपूरक व्यवसायाला हातभार लागणार आहे.
उद्यानातून सर्वव्यापी स्वयंरोजगार
वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात एकूण १६५ उद्यान आहेत. यापैकी एकूण १३४ उद्यानांवर महिला बचत गटाचे राज्य आहे. छोट्या उद्यानांच्या देखभालीसाठी गटाला १२, तर मोठ्या उद्यानांसाठी ५० हजार रुपये महापालिकेकडून देण्यात येतात. त्यामुळे सामूहिक रोजगार प्राप्त होत आहे.
वसई-विरार महापालिका महिलांना एकत्र आणून रोजगाराचे व्यासपीठ देत आहे, ज्यांच्या घरी आर्थिक चणचण आहे, अशांना हातभार लागत आहे. त्यामुळे अनेक महिला उद्योजक होत आहेत. घर, संसार सांभाळताना सामाजिक जीवनात भरारी घेत आहेत.
- गीता आयरे, मा एनजीओ महिला बचत गट
एकूण महिला बचत गट २,१३५
महिलांना रोजगार २१,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.