बेसुमार बांधकामांमुळे शहरात सापांचा वावर

बेसुमार बांधकामांमुळे शहरात सापांचा वावर

Published on

बेसुमार बांधकामांमुळे शहरात सापांचा वावर
तिसगाव नाका परिसरात नाग सापडल्याने खळबळ

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : शहराच्या पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरातील एका हॉटेलमागील नर्सरीत सकाळच्या सुमारास एक नाग आढळून आला. अचानक नाग दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र स्वामी वऱ्हाडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यंत सावधगिरी बाळगून नागाला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की शहरातील वाढती बेसुमार बांधकामे, झपाट्याने नष्ट होणारी जंगले आणि कमी होणारे हरित क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका पोहोचवत आहेत.

मलनिस्सारण वाहिनी, गटारे यांच्या माध्यमातून साप सहज शहरात वावरू शकतात. अशा परिस्थितीत नाग, घोणस, धामण यासारखे साप शहरातील बागांमध्ये, झाडाझुडपांत, पाण्याजवळ किंवा बंद असलेल्या ठिकाणी आढळतात. तिसगाव नाका परिसरात आढळलेला नाग सर्पमित्रांनी अत्यंत कुशलतेने पकडला. त्यांनी कोणतीही हानी न पोहोचवता सापाला सुरक्षित ठिकाणी सोडले. त्या वेळी अनेक नागरिकांनी त्यांचे आभार मानले. ‘‘साप कोणालाही उगाच हानी पोहोचवत नाही. तो फक्त आपल्या संरक्षणासाठी प्रतिक्रिया देतो,’’ असे स्वामी वऱ्हाडकर म्हणाले.

सर्पमित्र वऱ्हाडकर यांनी स्पष्ट केले की, शहरामध्ये झपाट्याने वाढणाऱ्या इमारती, कॉम्प्लेक्स, रस्ते आणि मोठमोठ्या प्रकल्पांमुळे सापांचे नैसर्गिक निवासस्थान उद्‍ध्वस्त होत आहे. यामुळे साप शहराकडे वळू लागले आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या काळात, साप अधिक सक्रिय होतात. कारण त्यांच्या अधिवासात पाणी साचते, त्यामुळे कोरड्या, सुरक्षित जागेच्या शोधात ते मानवी वस्तीकडे वळतात. उंदीर, पाली, बेडूक आणि इतर लहान प्राणी शहरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने, ते शिकारीसाठी शहरात प्रवेश करतात.

निसर्ग आणि शहरे यांच्यात समतोल गरजेचा
सध्या शहरात झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने साप, माकडं, रानडुक्कर, कोल्हे अशा अनेक वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीकडे आगमन वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात बांधकाम करताना पर्यावरणीय संतुलन राखणे, हरित पट्ट्यांचे जतन आणि वन्यजीवांसाठी जागा राखून ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com