नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची आवश्यकता

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची आवश्यकता

Published on

विमानतळावरून सुसाट प्रवास
वाहतूक व्यवस्थापनासाठी १७७ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही दिवसांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात वाहतुकीचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस शाखेसाठी स्वतंत्र १७७ पदनिर्मिती करण्याची मागणी नवी मुंबई पोलिसांकडून पोलिस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्तावातून करण्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर चार प्रवासी टर्मिनल, दोन धावपट्ट्या, एक ट्रक टर्मिनल, कार्गो हब, विमान कंपन्यांची कार्यालये, बँका, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच संरक्षण व हवामान विभागाशी संबंधित महत्त्वाच्या आस्थापना उभारल्या जाणार आहेत. यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या तसेच आयात-निर्यात होणाऱ्या मालवाहतुकीत वाढ अपेक्षित आहे. परिणामी, परिसरातील लोकसंख्या, व्यावसायिक हालचालींमध्येही झपाट्याने वाढ होणार आहे.
--------------------------------
पोलिसांसमोरील आव्हाने
- विमानतळ परिसरात कार्यरत राहण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष, बॉम्बशोधक-नाशक पथके, अग्निशमन दल, रुग्णालये अशी आवश्यक यंत्रणा उभारली जाणार आहे. तसेच कार्गो हब कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक वाढेल.
- खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, रोडपाली, पळस्पे, पनवेल, करंजाडे, उलवे, उरण, द्रोणगिरी अशा भागात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळ पोलिस ठाणे व वाहतूक शाखेसाठी ३९५ नवीन पदांची आवश्यकता आहे.
------------------------------------
वाहतुकीवर प्रचंड ताण
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर अंदाजे ३६० कोटी मेट्रिक टन मालवाहतूक, नऊ कोटी प्रवासी वाहतूक प्रतिवर्ष अपेक्षित आहे. ठाणे, तुर्भे, बेलापूर, तळोजा येथील औद्योगिक वसाहती, जेएनपीए बंदर, अटल सेतू, प्रस्तावित कोस्टल रोड, चार मेट्रो मार्ग, लोकल रेल्वे, हायस्पीड रेल्वेमुळे वाहतुकीचा प्रचंड ताण वाढणार आहे. परिणामी, कोंडी नियंत्रणासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे.
--------------------------------------
गृह विभागाकडे पदांसाठीचे प्रस्ताव
विमानतळ पोलिस ठाण्यासाठी २१६ पदांचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता; मात्र वित्त विभागाने पहिल्या टप्प्यात ५० टक्के म्हणजे १०८ पदे मंजूर करण्याची सूचना केली आहे. यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आता विमानतळ पोलिस ठाण्यासाठी १०८ पदे आणि वाहतूक शाखेसाठी आवश्यक सर्व १७७ पदे तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
------------------------------------
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर विमानतळ तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रचंड ताण वाढणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, सुरक्षिततेची समस्या उद्भवणार आहे. त्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची आवश्यकता आहे. त्यामुळे विमानतळ पोलिस ठाण्यासाठी १०८ पदे, वाहतूक शाखेसाठी आवश्यक १७७ पदे तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
- संजयकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त, मुख्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com