घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाला गती

घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाला गती

Published on

घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाला गती
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्यानंतर सेवा रस्त्यांची जोडणी; अडथळे हटवण्यास सुरुवात
ठाणे, ता. २५ (बातमीदार): घोडबंदर मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीला अखेर थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे दौऱ्यानंतर एमएमआरडीए व ठाणे महापालिकेने रस्त्याच्या रुंदीकरण आणि सेवा रस्त्यांच्या जोडणीला अधिक गती दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांसह नवी मुंबई, पालघर आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहनचालकांनाही याचा फायदा होणार आहे.

मुंबई आणि गुजरातला जोडणारा घोडबंदर मार्ग हा केवळ ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व औद्योगिक पट्टा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. उरण येथील न्हावा शेवा बंदरातून बाहेर जाणाऱ्या जड वाहनांच्या हालचाली या मार्गावरून होत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे हा मार्ग प्रचंड वाहतूक कोंडीत अडकला आहे.

रोज लाखो वाहनांच्या वाहतुकीचा भार सहन करणाऱ्या या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी ट्राफिक जाम ही सामान्य गोष्ट झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण, मेट्रोचे काम, झाडांची कापणी, खड्डेमय सेवा रस्ते या साऱ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत गायमुख ते विजय गार्डन मेट्रो रन चाचणी पार पडली. याच दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी घोडबंदर मार्गाच्या कामांना गती देण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले. यानंतर तातडीने पुढील कामे सुरू झाली आहेत.

सध्या सुरू असलेली प्रमुख कामे
सेवा रस्त्यांचे मुख्य रस्त्याशी विलीनीकरण
मुख्य व सेवा रस्त्यांदरम्यान येणाऱ्या झाडांची तोडणी
सेवा रस्त्यांच्या कडेला युटिलिटी डक्टसाठी खोदकाम - गटार, केबल लाइनसाठी
मेट्रो स्थानकांवरील उतरणारे जिने आणि फुटपाथचे नियोजन
रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या उच्च दाब विद्युत वाहिन्यांचे सर्वेक्षण व स्थलांतर
संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण

स्थानिकांचे मत आणि अपेक्षा
आमच्या भागात वाहतूक इतकी वाढली आहे, की लहान मुलांना शाळेत पोहोचवतानाही अर्धा तास जास्त लागतो. आता सेवा रस्त्यांमुळे थोडासा दिलासा मिळेल, पण काम लवकर पूर्ण व्हावे ही अपेक्षा आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. तसेच काही वाहनचालकांनीदेखील कामाच्या अनियमित वेळा आणि वाहतुकीच्या बदलत्या मार्गांमुळे होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे.

विकासाच्या दिशेने ठाणे
ठाणे शहर वेगाने विस्तारत असताना रस्ते, मेट्रो, सेवा रस्ते या पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यावश्यक आहे. घोडबंदर मार्गावरील कामांना गती मिळाल्याने नजीकच्या काळात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र कामांचा दर्जा आणि वेळेत पूर्णता यावरच या प्रकल्पाचे यश अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com