नदी संवर्धनाला तिलांजली

नदी संवर्धनाला तिलांजली

Published on

नदी संवर्धनाला तिलांजली
रायगडमध्ये प्रदूषणात वाढ; विविध योजना कागदावरच
सुनील पाटकर ः सकाळ वृत्तसेवा :
महाड, ता. २७ : भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधुसंतांनी देवतांचा दर्जा दिल्याने अनेक ठिकाणी नद्यांचे पूजन, आरती केली जाते. पण मानवी तसेच जैवविविधतेमध्ये योगदान देणाऱ्या नद्या प्रदूषणाच्या विळख्यात असून, संवर्धनासाठी आखलेल्या विविध योजना कागदावर असल्याने रायगड जिल्ह्यातील नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
भारतामध्ये बहुसंख्य मानवी संस्कृती नदीकाठी विकसित झाली आहे. त्यामुळे आजही अनेक शहरे नदीकाठी वास्तव्याला आहेत. शहरांमधून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक कारखान्यातील सांडपाणी, प्लॅस्टिक, घनकचरा, नद्यांमध्ये साठलेला गाळ, निर्माल्य अशा विविध कारणांमुळे नद्या संकटात सापडलेल्या आहेत. या संकटात रायगडमधील नद्या गुरफटल्या आहेत. ४० वर्षांपूर्वी शुद्ध पाण्यासाठी ओळखली जाणारी कुंडलिका नदी सर्वात जास्त प्रदूषित झालेली आहे. अशीच स्थिती पाताळगंगा, अंबा, सावित्री, गाढी या प्रमुख नद्यांची झाली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रदूषित नद्यांमुळे मत्स्यव्यवसाय, नदीकाठची शेती अडचणीत सापडली आहे.
-----------------------------
रायगडमध्ये ५५ प्रदूषित पट्टे
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२३ मधील अहवालात देशभरातील ६०३ नद्यांचे विश्लेषण करण्यात आले. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २७९ नद्यांमधील ३११ नदीपट्टे प्रदूषित आहेत. त्यात सर्वाधिक ५५ प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत. रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास नद्यांचा यामध्ये समावेश असून, रहिवासी तसेच उद्योगांमधील सांडपाण्याने पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावत चालली आहे.
------------------------
दुर्लक्षाचा परिणाम
- रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य नद्या प्रदूषित झाल्या आहेत. याचा परिणाम सिंचन, पिण्याचे पाणी तसेच आरोग्यावर झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाळ्यामध्ये सांडपाणी सोडत असल्याने प्रदूषण वाढले आहे. यामुळे माशांच्या विविध प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
- जिल्ह्यातील नद्यांची पात्रे गाळांनी भरल्याने पुराची समस्या अनेक गावांना भेडसावत आहे. यामध्ये महाड, रोहा, नागोठणे, पोलादपूर अशा गावांना सातत्याने सामना करावा लागतो. जिल्ह्यातील नद्यांचे संवर्धन करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेणे गरजेचे झाले आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे काम थांबले आहे.
----
संवर्धन आराखडा कागदावर
प्रदूषित पाण्याचे पुनरुज्जीवन, वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून साठवून ठेवणे, नदीकिनारी अनधिकृत बांधकामांची संख्या कमी करणे, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करणे, नद्यांच्या आसपास कचरा न टाकणे, नद्या आणि जलस्रोतांच्या आसपास स्वच्छता ठेवणे, नदीच्या काठावर वृक्षलागवड, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलणे, नदी स्वच्छतेच्या मोहिमा आणि संवर्धन कार्यक्रमांमध्ये सक्रिय भाग घेणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. याचे नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातही करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी निधीअभावी रखडली आहे.
----
सावित्री नदीखोऱ्यातील गांधारी (नाते) आणि काळ (वाळण) या दोन उपनद्यांमध्ये नदी संवर्धन करण्यात आले. यावर्षी त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. यासाठी शासन आणि विविध सामाजिक संस्था मदत करीत आहेत. इतर नदीखोऱ्यांतील नागरिकांनी पुढाकार घेऊन नदी संवर्धन करणे गरजेचे आहे. फक्त ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- गणेश खातू, सावित्री नदी प्रहरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com