रिक्षाचालकांची मुजोरी
रिक्षाचालकांची मुजोरी
लांबच्या भाड्यांची पळवापळवी
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) ः ठाणे रेल्वेस्थानक मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. १० फलाटांची संख्या असलेल्या या स्थानकातून रोज सुमारे नऊ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बससारख्या सार्वजनिक वाहतुकीवर ठाणे स्थानकाचे प्रवासी अवलंबून आहेत. रिक्षाचालकांना मोठा रोजगार मिळवून देण्यात हे वरच्या क्रमांकावर आहे; परंतु असे असतानाही मुजोर रिक्षाचालकांकडून जादा भाड्यासाठी लांबच्या प्रवाशांची पळवापळवी होण्याचे प्रकार घडत असून इतर प्रवाशांना मात्र रिक्षा मिळणे कठीण होत आहे. स्थानक गाठण्यासाठीही त्यांना याच संकटाचा सामना करावा लागतो.
ठाणे रेल्वेस्थानकातून रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत असल्याने बाहेरगावी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे स्थानक परिसर नेहमी प्रवाशांनी गजबजलेला असतो. सकाळ, संध्याकाळ येथे प्रचंड गर्दी होते. ठाणेकर नागरिक स्थानकात येण्याकरिता बऱ्याचदा रिक्षावर अवलंबून असतो. रोज सुमारे चार लाख प्रवासी रिक्षाचा वापर करतात. मोठा प्रवासीवर्ग रिक्षावर अवलंबून असल्याने ही वाहतूक सुलभ आणि पारदर्शी असणे आवश्यक असताना मुजोर रिक्षाचालकांनी मात्र या वाहतुकीचा बट्ट्याबोळ केला आहे.
मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लुबाडणूक केली जात आहे. प्रवाशांसोबत दादागिरीची भाषा करून जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार सर्रासपणे घडू लागले आहेत. स्थानकाबाहेर पश्चिमेला ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या मदतीने रिक्षा थांबे तयार केले आहेत. एकाच वेळी चार रांगा लागतील आणि शहरात कुठेही जाणारा प्रवासी कोणत्याही रांगेत बसेल, अशी येथे व्यवस्था निर्माण केलेली असतानाही रिक्षाचालकांनी मात्र लांबचे, जवळचे भाडे घेण्यासाठी वेगवेगळ्या रांगा तयार केल्या आहेत. रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशाला कुठे जायचे, असे विचारून त्यानुसार त्याला त्या रांगेत पाठवले जाते. जवळच्या प्रवाशांसाठी एकच रांग उपलब्ध करून दिली गेली असून इतर तीन रांगेतील रिक्षांमध्ये लांबचे प्रवासी भरले जातात. त्यामुळे जवळ जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. रिक्षा थांब्यावर दादागिरी करून भाडे पळवणारे रिक्षाचालक घोळक्याने उभे राहून रांगेतले लांबचे भाडे घेऊन जातात. इतर प्रवाशांना मात्र बराच वेळ रिक्षाची वाट पाहत उभे राहावे लागते.
चाकरमान्यांची अडवणूक
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी स्थानक आणि घर गाठण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. या गर्दीचा गैरफायदा घेत रिक्षाचालक जादा भाड्याचे मागणी करतात. २६ रुपयांच्या ठिकाणी ५०-६० रुपये घेतात.
प्रवाशांसोबत दादागिरी
ठाणे स्थानक परिसरात बनविण्यात आलेल्या रिक्षा थांब्यामध्ये रिक्षा उभी न करता काही रिक्षाचालक थांब्याबाहेर रिक्षा उभी करून रेल्वेस्थानकातून बाहेर पडत असलेल्या नवख्या आणि गरजू प्रवाशाला हेरून रिक्षात बसवतात आणि जादा भाड्याची आकारणी करतात. ते देण्यास नकार दिल्यास दादागिरीदेखील केली जाते.
बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
उत्सवामुळे शहरात सायंकाळी वाहन कोंडी होत असून प्रवाशांना स्थानकाकडे जाण्यासाठी प्रवाशांना तारेवरचे कसरत करावी लागते. गर्दीमुळे रिक्षाचालक स्थानकात जाणे टाळतात. तर स्थानकाकडून जाणारा बाजारपेठेतील वाहतुकीचा रस्ता सायंकाळी गर्दीमुळे वाहतुकीकरिता बंद ठेवला जात असल्यामुळे स्थानकाकडे जाण्याकरिता बसचाही तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत स्थानकात पोहोचणे फारच कठीण होत आहे.
फोटो : जवळच्या प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते आहे.
लांबच्या प्रवाशांकरिता विशेष रांगेची सुविधा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.