बाबा बंगालीवर जालीम इलाज

बाबा बंगालीवर जालीम इलाज

Published on

बाबा बंगालीवर जालीम इलाज
कायद्यासोबत प्रबोधनाची आवश्यकता; अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणाऱ्यांचा सूर


नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः केवळ कायदा राबवून बाबा बंगाली किंवा फसवणूक करणाऱ्यांचा भोंदूबाबांचा धंदा बंद होणार नाही. जोपर्यंत आपण तार्किक विचार करत नाही. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत नाही, तोपर्यंत बाबांचा धंदा सुरूच राहणार आहे. जादूटोणाविरुद्ध कायदा करण्यात महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य ठरले आहे; मात्र कायद्यासोबत समाजप्रबोधनाची तेवढीच गरज आहे. कायद्यातच या गोष्टींचा अंतर्भाव केला असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्यरत असलेल्या दिग्गजांनी व्यक्त केले आहे.

तंत्र-मंत्राच्या साहाय्याने जीवनातील सर्व समस्यांचे समाधान करण्याचा दावा करणाऱ्या बंगाली बाबांच्या धंद्याना मुंबईच्या लोकलमध्ये लाइफलाइन मिळत आहे. ‘सकाळ’ने या बाबांची पोलखोल केली. ‘सकाळ’च्या मोहिमेनंतर या बाबांवर कारवाई सुरू झाली आहे; मात्र शासकीय मोहिमा पुढे जावून थंड पडतात. मुळात या जाहिरातींना सामान्य माणसे का भुलतात हा कळीचा मुद्दा आहे. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १२ वर्षे झाली, सुरुवातीला या कायद्यासंदर्भातील प्रबोधन, प्रशिक्षण चांगले झाले; मात्र हळूहळू ते मागे पडले. याचाही एक परिणाम भोंदूबाबाच्या वाढत्या नेटवर्कमागे असल्याचे या चळवळीत सक्रिय असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

मुंबईच्या लोकलमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यांचे बंगाली बाबाच्या पोस्टरकडे चटकन लक्ष वेधले जाते. यातील अनेक जण डोक्यात असंख्य प्रश्न व अडचणी घेऊन प्रवास करत असल्यामुळे तार्किक विचार करण्याची त्याची मनःस्थिती नसते, हे करून बघायला का हरकत आहे, असा सोपा विचार ते करतात, त्यातून बाबांचे फावते, असे मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले. रेल्वे, बस, शौचालयांत चिकटवलेल्या बाबांच्या जाहिरातीकडे कोण बघते, असे आपल्याला वाटत असेल; मात्र याला बळी पडलेल्यांची संख्या खूप आहे, त्यात सुशिक्षितांचा भरणा असल्याचे या चळवळीत काम करणाऱ्यांनी सांगितले. दुसरे म्हणजे जीवनातील अनेक समस्या वास्तविक पद्धतीने सोडवायच्या असतील तर त्यात जे कष्ट घ्यावे लागते, त्याची बहुतांश लोकांची तयारी नसल्यामुळे बाबा बंगालींना अनेक ग्राहक मिळतात, असे एका आघाडीच्या मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.


मुळात जे लोक अंधश्रद्धा बाळगतात तेच या बाबांना बळी पडतात. तार्किक विचार करणारे यामध्ये फसत नाहीत. मुळात कायदा केल्याने या समस्या सुटणार नाही; मात्र कायद्यामुळे या बाबांवरच्या कायदेशीर कारवाईला एक व्हॅलिडिटी मिळते. त्यानिमित्ताने लोकशिक्षण होते. पोलिस, सामान्य जनतेचे प्रबोधन व्हावे, या गोष्टी आम्ही कायद्यातच अंतर्भूत केल्या. कायदा व प्रबोधनाच्या संयुक्त मोहिमेतून यावर तोडगा निघू शकतो.
- श्याम मानव, संस्थापक, अखिल भारतीय अंनिस समिती


मुळात अशा गोष्टीचे तांत्रिक उपाय असतात का? याचा तार्किक विचार केला तरी ते शक्य नाही, हे आपल्या सहज लक्षात येईल. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा आहे, अंगात दैवी शक्ती आहे, असे भासवणेदेखील कायद्याने गुन्हा आहे.
- मुक्ता दाभोळकर, अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य

सर्वांना कष्ट न करता, शॉर्टकट यश मिळवायचे आहे. अभ्यास न करिता पास व्हायचे आहे, चांगली बायको हवी आहे, काम न करताच पैसे पाहिजे, या मानसिकतेमुळे भोंदू बाबांना ग्राहकांची कमी पडत नाही. चमत्कारावर असलेला अतिविश्वास याला कारणीभूत आहे.
- मिलिंद देशमुख, सदस्य, अंनिस राज्य कार्यकारिणी

प्रेम, नाती जपण्यासाठी आपल्याला संयम बाळगावा लागतो, जोडीदाराला समजून घ्यावे लागते. बँकेचे कर्ज काढले तर ते फेडावेच लागले. परीक्षेत पास व्हायचे असेल तर अभ्यासापासून सुटका नाही; मात्र हे शाश्वत उपाय आपल्याला नको आहेत. त्यामुळे आपण सोपा उपाय, म्हणजे भोंदू बाबाकडे वळतो.
- डॉ. विभावरी देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com