नवी मुंबई विमानतळाला दि.बांचेच नाव
नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निश्चित झाले असून, ते लवकरच घोषित केले जाईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नवी मुंबईत शनिवारी (ता. २७) शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
शिंदे यांनी या वेळी भूमिपुत्रांची गरजेपोटी बांधकामे नियमित करणे, सिडकोच्या घरांच्या किमती आणि वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व आढावा घेण्यासाठी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना शिंदे यांनी राज्यात सोलापूर आणि धाराशिव येथे झालेल्या पूरजन्य परिस्थितीवरून विरोधकांवर टीका केली. आपण पूरग्रस्त भागात प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असून, बोटीतूनही दौरे केले आहेत. सध्या शिवसेना आणि राज्य सरकारतर्फे २२ प्रकारच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जात आहे. विरोधकांना मात्र साहित्यावर छापलेले आमचे फोटो दिसले, पण त्यातील जीवनावश्यक वस्तू दिसल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
शिवसेना सामान्य लोकांचा पक्ष असल्याचे सांगत नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव लवकरच मिळणार असल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना केलेल्या विकासकामांची जंत्री लोकांच्या घरी पोहोचवल्यास नवी मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिंदे यांच्या उपस्थितीत स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. कदम यांनी त्यांच्या भाषणात नवी मुंबईतील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची मागणी शिंदे यांच्याकडे केली.
सिडको घरांच्या किमती लवकरच कमी होणार
शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात प्रस्ताव घेऊन आपल्याकडे येण्यास सांगितल्याचे नमूद केले. तसेच नवी मुंबईसह एमएमआरला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी एमएमआरडीएला सर्वेक्षण करण्याचे काम दिले असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शाखाप्रमुखांना टीका करण्याची मुभा द्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात सत्ता आली असून, मंत्री झाल्यानंतर काही लोक बोलायला लागले आहेत. अशा बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शाखाप्रमुखांना मुभा द्या, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. आपल्यावर होत असलेल्या टीकेला आपण उत्तर देत नाही. आपली सहनशक्ती अधिक आहे, पण आपल्यावर झालेल्या टीकेला नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तर देतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.