नमुंमपा पाच शहरांना करणारा स्वच्छतेविषयी मार्गदर्शन
नवी मुंबई पालिकेला मारदर्शकाचा बहुमान
सुपर स्वच्छ लीगमध्ये स्वच्छतेसाठी पाच नगर परिषदांसोबत सहकार्य
वाशी, ता. २८ (बातमीदार) ः स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत देशभरातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सुपर स्वच्छ लीगमध्ये समाविष्ट नवी मुंबई पालिका शहरास राज्यातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर, कन्नड या नगर परिषदा स्वच्छ शहर जोडीमध्ये दिल्या आहेत.
या पाच शहरांशी नवी मुंबई पालिकेचा स्वच्छ शहर जोडी म्हणून सामंजस्य करार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित नगर परिषदांच्या उच्च अधिकाऱ्यांसमवेत पार पडला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि पाचही नगर परिषदांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता हीच सेवा अभियान कालावधीत स्वच्छ शहर जोडी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, शहरी स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत शहरांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठी हा एक कालबद्ध आणि परिणाम केंद्रित उपक्रम आहे. दृश्यमान स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि वाहतूक, घनकचरा प्रक्रिया, स्वच्छतेची उपलब्धता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा सेवांचे यांत्रिकीकरण आणि स्वच्छताकर्मींचे कल्याण, स्वच्छताकार्यात लोकसहभाग आणि नागरिकांचा अभिप्राय व सक्षम तक्रार निवारण प्रणाली अशा आठ विषयांवर केंद्रित क्षेत्रांमध्ये पालिकेसारखे मार्गदर्शक शहर आणि लोणार, जिंतूर, मलकापूर, केज, कन्नड अशा स्वच्छतेविषयी मार्गदर्शन घेणाऱ्या नगर परिषदा असणाऱ्या शहरांमध्ये परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होणार आहे. या पाच शहरांची स्वच्छ सर्वेक्षणातील रँकिंग कमी असून, त्यांची रँकिंग उंचावण्यासाठी पालिका मार्गदर्शक सहकार्य करणार आहे. या उपक्रमाचे मूल्यांकन स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ दरम्यान केले जाणार आहे.
‘या’ शहरांचा समावेश
या पाच शहरांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एक व विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन अशा एकूण पाच शहरांचा समावेश आहे. पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यापूर्वीच दूरदृश्य प्रणालीद्वारे या शहरांच्या मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधला असून, संपूर्ण मार्गदर्शक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सुपर स्वच्छ लीग ही विशेष मानांकित कॅटेगरी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये पालिकेचा समावेश आहे. त्यामध्ये अधिक भर घालत आता नवी मुंबई शहरास राज्यातील पाच नगर परिषदा असलेल्या शहरांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्याचा बहुमान मिळाला आहे. ही नवी मुंबईकर नागरिकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नमुंमपा