कौशल्य विकास उपक्रमाला दाभेरी आश्रमशाळेत सुरुवात
जव्हार, ता. २८ (बातमीदार) ः आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आणि कौशल्य दडलेले आहे. त्यांना योग्य संधी व साधनसामग्री मिळाल्यास ते निश्चितच आत्मनिर्भर बनतील. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगारक्षम कौशल्य मिळेल, ज्यामुळे ते भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे प्रतिपादन डॉ. अपूर्वा बासूर यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दाभेरी उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विविध कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात शनिवारी (ता. २७) प्रकल्प अधिकारी डॉ. बासूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्वावलंबनासाठी विविध कौशल्य विकास उपक्रमासाठी आवश्यक निधी डार्क केटल केमिकल इंडिया लिमिटेड या कंपनीने सीएसआर फंडातून दिला आहे. या संस्थेने केवळ निधीच नव्हे, तर प्रशिक्षणासाठी लागणारे शिलाई मशीन, अत्याधुनिक संगणक कक्ष, उपकरणे, तसेच इतर सर्व आवश्यक साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिवणकला, संगणक प्रशिक्षण, प्लंबिंग, वायरमन आणि वेल्डिंग यांसारख्या रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी अनुभवी व प्रशिक्षित मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.