नवचैतन्याचा उत्सवात कोसळधार
वसई, ता. २८ (बातमीदार) ः एकीकडे नवरात्रोत्सव सुरू असताना नागरिकांना उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २८) सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि पाऊस कोसळत होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वसई-विरार शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने देवीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक आतुर होते; परंतु जोरदार पाऊस सुरू झाल्याने घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. बऱ्याच भागात पाणी साचले होते. त्यामुळे शहरात पडलेले खड्डे व पाणी यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. वसई तालुक्यात अनेक समुद्रकिनारे आहे. त्यामुळे येथील गावे सुरक्षित राहावीत, याकडे प्रशासनाकडून लक्ष देण्यात येत आहे. जिल्हा व वसई-विरार महापालिका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वय साधत आहे. अतिवृष्टीदरम्यान आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित निवारा किंवा मदत शिबिरांमध्ये हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यावर भरती-ओहोटीच्या वेळा तपासून मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळपासून काळाकुट्ट अंधार, जोरदार वारा आणि पाऊस सुरूच आहे. शनिवारी रात्री दांडिया, गरबा खेळण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते; परंतु पावसाने हजेरी लावल्यावर आनंदावर विरजण पडले. काही हौशी पावसाची तमा न बाळगता नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यात मग्न झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.
विजेचा लपंडाव
वारा, पाऊस सुरू असल्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला. अनेक भागांत वीजसेवा खंडित झाली. त्यामुळे रहिवासी संकुलासह व्यापारीवर्गाला याचा फटका बसला. वीज नसल्याने इंटरनेटपासून मोबाईल चार्जिंग, विद्युत उपकरणे बंद झाली होती.
सरकार, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन यंत्रणेकडून अतिवृष्टीबाबत लक्ष ठेवण्यात येत आहे. जोरदार वारा आणि पाऊस असल्याने आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.