गणितात नापास होऊनही बनल्या यशस्वी उद्योजिका

गणितात नापास होऊनही बनल्या यशस्वी उद्योजिका

Published on

गणितात नापास होऊनही बनल्या यशस्वी उद्योजिका
संगीता कोळी ः व्यावसायिक बनून यांनी जपली सामाजिक बांधिलकी
संजीव भागवत ः सकाळ वृृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः दहावीच्या परीक्षेत गणितात नापास झाल्यानंतरही दैनंदिन जीवनातील येणारे अनुभव आणि विविध नियतकालिके, दैनिकांतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर संगीता कोळी यांनी अनेक कौटुंबिक संघर्षांना तोंड देत यशस्वी उद्योजिका ठरल्या आहे.
सांगली जिल्‍ह्यातील वाळवा तालुक्‍यातील कारंदवाडी येथे संगीता कोळी यांचा जन्म झाला. सावित्री लोकसंचलित साधन केंद्र चालवतात. ज्ञानदा स्‍वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून त्‍यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.

संगीता कोळी यांना आयुष्याच्या सुरुवातीलाच कठोर धक्के बसले. व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा, भांडवल नसल्‍याने ‘स्त्री म्हणून माझी स्वप्नं कुणी चिरडू शकत नाहीत, हा निर्धार त्यांनी मनाशी पक्का केला. आज त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) आधाराने यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.
महाबळेश्वरसारख्या अनोळखी ठिकाणी, हातात थोडेसे सामान आणि डोळ्यांत भविष्याची स्वप्नं घेऊन, त्यांनी बसस्थानकावरच सलग १३ दिवस-रात्र काढली. पोटापुरतं थोडं अन्न, पण मनामध्ये पोलादासारखी जिद्द. त्या १३ रात्रींनीच त्यांना पुढच्या आयुष्याचा खरा पाया घालून दिला. त्यांनी मनुका विक्रीतून सुरू केलेला प्रवास हळूहळू विस्तारत गेला. काजू प्रक्रिया प्रशिक्षण घेतले, कोकम, काजू, अंजीर यासारखी उत्पादने विकण्यास सुरुवात केली.
आज महाबळेश्वरच्या बाजारात त्यांचा स्टॉल हे केवळ व्यवसायाचे ठिकाण नाही, तर २० लाख रुपयांच्या उलाढालीचा यशस्वी उद्योग त्यांनी सुरू केला असून, त्या अनेकांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.

समाजसेवेचे अनोखे कार्य
संगीता कोळी यांनी तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योजकतेकडे वळवले, महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त केले. स्वीट कोकमसारखी उत्पादने तयार करून आरोग्य आणि स्थानिक संसाधनांचा मेळ साधला. व्यवसायाबरोबरच त्यांनी समाजसेवाही साधली.महाबळेश्वरच्या खोल दऱ्यांमध्ये अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढणे, जखमींना स्वतःच्या गाडीतून रुग्‍णालयांमध्ये पोहोचवणे अशी कामे गेल्‍या ३० वर्षांपासून त्‍या करीत आहेत.

कार्याची दखल
२०१९ च्या पुरात पूरग्रस्त गावांना मदत, कोरोनाकाळात क्वारंटाइन विभागात सेवा, मनोरुग्ण शिबिरामध्ये सहभाग, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांमध्ये त्‍यांचा सहभाग असतो.
२०२४ - ईशान्य फाउंडेशनचा कलाविष्कार पुरस्कार, २०२०- महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून उत्कृष्ट पोलिस मित्र पुरस्कार, हिरकणी पुरस्कार-आंबेनळी दुर्घटनेतील मदतकार्यासाठी सहकार्य, पटना बिहार येथे सेल्स वूमन प्रथम प्रमाणपत्र, गुवाहाटी कारागीर मेला-कोकमसाठी उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन प्रथम क्रमांक, २०२५ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त विक्री कौशल्य पुरस्कार, नाबार्ड पुणे येथे विक्री कौशल्य पुरस्कार २०२५, दखन्न जत्रा सांगली येथे प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट उचांकी विक्री प्रमाणपत्र २०२५, इस्लामपूर येथे आयबीएफ पुरस्कार २०२५, नाबार्ड, माविम महाबळेश्वर ट्रेकर्स, वाळवा ग्रामपंचायत यांच्याकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

आत्‍मविश्‍वास, जिद्द, समाजाची साथ
अत्याचार असो वा गरिबी, स्त्रीला थांबवणारा कोणी नाही. आत्मविश्वास, जिद्द आणि समाजाची साथ असल्‍यास प्रत्येक जखम यशामध्ये बदलता येते. अशा शब्‍दांत संगीता कोळी या आपल्‍या संघर्षमय प्रवासाबद्दल बोलतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com