किनारपट्टी जिल्ह्यांसाठी २४ तास धाेक्याचे!
किनारपट्टी जिल्ह्यांसाठी
२४ तास धाेक्याचे!
उपमुख्यमंत्री शिंदेंचा आपत्कालीन यंत्रणेचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यासह सर्व जिल्ह्यांतील पावसाचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थिती हाताळताना मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांच्या क्षेत्रात २४ तासांत झालेल्या पावसाची माहिती घेतली. या वेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी या महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
दोन दिवसांपासून सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचे सांगून सरासरी ८० ते १०० मिमी पावसाची नाेंद झाल्याची माहिती सर्वांनी दिली. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली आहे; मात्र धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बदलापूरमध्ये काल एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधनहानी झाल्याची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. पावसाचा जोर कमी-जास्त होत असल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. रात्रीपर्यंत रेड अलर्ट दिला असल्याने विशेष काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी या वेळी दिले.
----
२४ तास संपर्कात राहा!
पुराचा धाेका असलेली ठिकाणे हेरून तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे, पालिकांच्या शाळेतील वर्गात त्यांची व्यवस्था करावी, तसेच जेवण आणि पाण्याची सोय करावी. सर्वच आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपले फोन २४ तास सुरू ठेवावेत. वीज महामंडळाबाबत फोन न घेण्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांनी या सूचनेचे पालन कटाक्षाने करावे, असे सांगितले. आपत्कालीन सेवांत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑन फील्ड सज्ज राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा!
ठाणे, भिवंडी, उल्हासनगर महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्यावे. एखादी इमारत खचल्याची घटना निदर्शनास आल्यास ती इमारत तत्काळ रिकामी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. धरणांच्या पाणीपातळीकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावे, असेही सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.