ठाण्यात वेगवान वाहतुकीचे जंक्शन

ठाण्यात वेगवान वाहतुकीचे जंक्शन

Published on

ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे ‘मल्टिमोडल’ जंक्शन
बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे स्थानक हे देशातील पहिले मल्टिमोडल इंटीग्रेटेड स्टेशन म्हणून विकसित केले जात आहे. ठाण्यातील बुलेट ट्रेन स्थानक हे रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके आणि लगतच्या महामार्ग व विशेष रस्त्यांद्वारे विमानतळाशी जोडले जाणार आहे. यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पातील (बुलेट ट्रेन) महाराष्ट्रातील चार स्थानकांपैकी (मुंबई, ठाणे, विरार, बोईसर) ठाणे स्थानक महत्त्वपूर्ण आहे. या स्थानक परिसरांचा नियोजनपूर्वक विकास करणे प्रस्तावित आहे. यासाठी भारत सरकार, जपान सरकार व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. यापैकी ठाणे व विरार स्थानक परिसराचा विकास आराखडा स्थानिक महापालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी जायका व नगरविकास विभाग संयुक्तपणे करीत आहे. या प्रक्रियेत नियोजनामध्ये सर्व भागधारक घटकांचा समावेश करून त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वात शहरविकास विभागाने चर्चासत्राचे संयोजन केले होते.
केंद्र सरकारची नगर नियोजन संघटना, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका), नगररचना आणि मूल्यांकन विभाग, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि वसई-विरार महापालिका यांचे प्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक आदी उपस्थित हाते. या वेळी ठाण्यात सुरू असलेल्या कामांविषयी सविस्तर माहिती देत सादरीकरण करण्यात आले. या मार्गावरील ठाण्यातील स्टेशन परिसर विकास करताना २५ टक्क्यांहून अधिक जागेवर हरित क्षेत्र राखले जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

सर्वसमावेशक, नियोजनबद्ध प्रकल्प
बुलेट ट्रेन प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध असावा, यासाठी स्थानक उभारणीसोबतच सार्वजनिक वाहतूक सुविधा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यात भविष्यात रोजगाराच्या संधी वाढून आर्थिक विकासाला गती मिळेल, असे शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांनी सांगितले. ठाण्यातील म्हातार्डी येथे हे बुलेट ट्रेन स्थानक आकाराला येत आहे. सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व वाहतुकीचे पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी अत्यंत नियोजनबद्ध जोडणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com