पुराच्या पाण्याचा भाविकांना फटका

पुराच्या पाण्याचा भाविकांना फटका

Published on

कासा, ता. २९ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २८) रात्री चरी कोटबी येथे पुराच्या पाण्यात खासगी बस अडकून १६ महिला व एका चालकाचा जीव धोक्यात आला होता; मात्र प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वेळेवर केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

वसई येथून १६ महिला भाविक संतोषीमातेच्या दर्शनासाठी डहाणूकडे खासगी बसने रवाना झाल्या होत्या. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही बस चरी कोटबी-वानगावमार्गे आशागडकडे जात असताना पारसपाडा पुलानजीक रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अडकली. पाणी वाढल्याने बस वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच चरी कोटबीच्या सरपंच वसुंधरा कलांगडा, त्यांचे पती विनोद, स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी तत्काळ बस दोरीने झाडाला बांधून ठेवत महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. आशागड पोलिस, डहाणू तहसीलदार सुनील कोळी, डहाणू पोलिस अधिकारी किरण पवार, वाणगाव पोलिस अधिकारी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने १६ महिला व चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. किरकोळ जखमी महिलांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
----
पालघर परिसरात भाविकांची बस पाण्यात अडकली

पालघर (बातमीदार) ः सफाळे पूर्वेकडील गेरूचा ओहळ परिसरातील रस्त्यावर शनिवारी (ता. २७) रात्री पुराचे पाणी साचले. या पाण्यातून मार्गक्रमण करताना एक खासगी बस बंद पडल्याने खळबळ उडाली. बसमधील महिला प्रवाशांना अखेर ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

शनिवारी रात्री सफाळे येथील सर्पमित्र प्रशांत मानकर व त्याचे मित्र गेरूच्या ओहळ परिसरात पाण्याची स्थिती पाहण्यासाठी गेले असता, त्यांना बस पाण्यात अडकलेली दिसली. त्यांनी ही माहिती उंबरपाडा-सफाळेचे उपसरपंच राजेश म्हात्रे यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसरपंच म्हात्रे हे जेसीबी घेऊन घटनास्थळी धावून आले. ही बस कल्याण-डोंबिवलीतील मानपाडा येथून पालघर जिल्ह्यात नवदेवी दर्शनासाठी आली होती; मात्र गेरूच्या ओहळाजवळ रस्त्यावर साचलेले पाणी किती खोल आहे, याचा अंदाज न आल्याने बस पाण्यातच थांबली. बसचा स्टार्टर बंद पडल्यामुळे स्थानिक मेकॅनिकला बोलावूनही ती सुरू होऊ शकली नाही.

म्हात्रे यांच्या जेसीबीच्या साह्याने बसजवळील पेट्रोल पंपावर सुरक्षित हलवण्यात आली. त्यानंतर बसमधील महिला प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामसेवालय, सफाळे येथील सभागृहात मुक्कामाची व्यवस्था करून देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ नीलेश वझे यांनी महिलांना चहा व बिस्किटांची सोय करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com