आदर्श स्वच्छतागृहे उभारणार!
भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : सार्वजनिक स्वच्छतागृहे म्हटली की, बहुतेक जण नाक मुरडतात. स्वच्छतागृहातील अस्वच्छता, दुर्गंधी, तुटलेले दरवाजे, गळके नळ अशी दुरवस्था अनेक ठिकाणी दिसून येते. मिरा-भाईंदर शहरदेखील याला अपवाद नाही, मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहाचे हे चित्र बदलून त्याजागी आदर्श स्वच्छतागृहे निर्माण व्हावीत व नागरिकांना त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही तत्त्वे महापालिका, तसेच खासगी संस्थांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी बंधनकारक असणार आहेत.
शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात सार्वजनिक स्वच्छतागृहे महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातदेखील सार्वजनिक स्वच्छतागृहांची निगा याला स्वतंत्र गुण दिले आहेत. मिरा-भाईंदर पालिकेला अलीकडेच स्वच्छ भारत अभियानात तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात देशपातळीवर पहिला क्रमांक मिळाला आहे. हा लौकिक कायम ठेवण्याची जबाबदारी आता महापालिकेवर आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली.
घनदाट वस्ती, झोपडपट्ट्या, मंडई, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे, बसथांबे आदी ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी सातत्याने येते. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता प्रशासनाकडे येणाऱ्या अर्जांतून स्वच्छतागृहांची आवश्यकता, ठिकाण, लोकसंख्येची घनता आदी निकषांवर ठिकाणांची निवड केली जाणार आहे. या ठिकाणांचे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातून पात्र ठरणाऱ्या प्रस्तावांची शिफारस शहरस्तरीय समितीकडे केली जाणार आहे. या समितीत अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक, कार्यकारी अभियंता यांचा समावेश असणार आहे. ही समिती स्वच्छतागृहांची जागा अंतिम करणार आहे. त्यानंतर पालिकेकडून प्रत्येक स्वच्छतागृहाच्या आवश्यकतेनुसार आराखडे तयार केले जातील. त्यानुसारच बांधकामे करणे बंधनकारक असणार आहे.
या सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या स्वच्छतागृहांसाठी पालिकेकडून विविध निकषांवर गुण निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी किमान ७० टक्के गुण मिळवणाऱ्या प्रस्तावांनाच मान्यता देऊन महापालिकेकडून संबंधितांसोबत करारनामे केले जाणार आहेत. या तत्त्वांना आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
या सुविधांचा समावेश
स्वच्छतागृहाच्या सभोवती हरित क्षेत्र असणे, तसेच स्वच्छतागृहांच्या भिंतीवरही हिरवळ करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्वच्छतागृहांमध्ये देखभाल करणाऱ्याचा कक्ष, महिलांसाठी सॅनिटरी पॅड, वेंडिंग यंत्र व इन्सिनरेटर, ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरापेटी, मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही आदी सुविधा असणार आहेत.
अस्वच्छता असल्यास नोटीस
नवीन स्वच्छतागृह योग्य पद्धतीने कार्यान्वित राहावे, गुणवत्तेची खात्री राहावी, तसेच उत्तरदायित्व सुनिश्चित व्हावे, याची काळजीही महापालिकेकडून घेतली जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून समितीची स्थापना केली जाणार आहे. समितीला स्वच्छतागृहाच्या ठिकाणी साफसफाई, देखभाल व दुरुस्ती समाधानकारक आढळून आली नाही, तर संबंधितांना ३० दिवसांची नोटीस बजावून स्वच्छतागृह पालिकेकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.
शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता वाढत आहे. ती आदर्श राहावीत व त्याचा वापर करणाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
- दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.