बदलापुरातील उल्हास नदीचा काठ स्वच्छ
बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय नदी दिनानिमित्त वनशक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची स्वच्छता करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नदी असलेल्या उल्हास नदीमध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वच्छतेची मोहीम वनशक्तीचे नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली. या मोहिमेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, धनाजी ईरमाळी तसेच बदलापूर शहरातील इतर स्वयंसेवक उपस्थित होते.
पर्यावरणासाठी लढा देणारी आणि पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वनशक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नदी स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येते. यंदा ही मोहीम बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी परिसरात करण्यात आली. मे महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे, उल्हास नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. त्यातच वाहत्या पाण्यात टाकण्यात येणारे निर्माल्य, इतर घाण कचरा, प्लॅस्टिक हे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत होते. नदीच्या गुणधर्मानुसार, तिच्या प्रवाहात आलेली घाण कचरा, ती काठावर लोटून देते. त्यामुळे नदीकाठच्या वाढलेल्या वनस्पतींवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांची तहान भागवणाऱ्या या उल्हास नदीचे पात्र आणि नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यासाठी वनशक्ती संस्थेने पुढाकार घेतला. वनशक्तीचे नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली रविवार (ता.२८) सकाळी उल्हास नदीच्या स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यासह धनाजी इरमाळी व इतर अनेक स्वयंसेवकांनी स्वतःहून पुढाकार घेतला. या सगळ्या स्वयंसेवकांनी नदीच्या पात्रात जिथे पोहोचता येईल. तिथपर्यंतची आणि नदीकाठची सगळी घाण आणि कचरा उचलून या कचऱ्याची विल्हेवाट लावत नदी परिसर स्वच्छ केला.
देशातील ४०० नद्यांपैकी बदलापुरातील उल्हास नदी महत्त्वाची आहे. संपूर्ण बदलापूर शहराला या नदीतून पाणीपुरवठा होतो. जवळपास ४० ते ५० एमएलडी पाणी हे उल्हास नदीतून मिळते. शहरात सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने जवळजवळ निम्म्याहून जास्त सांडपाणी हे थेट नदीला येऊन मिळते. त्यामुळे अनेक वर्षांत नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबईतील वनशक्ती सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. शहरातील एक जागरूक नागरिक आणि जबाबदार माजी लोकप्रतिनिधी म्हणून मी व माझे सहकारी प्रत्येक वेळी या मोहिमेत सहभाग नोंदवतील.
- राजेंद्र घोरपडे, माजी नगराध्यक्ष
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहराला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची नदी आहे. या नदीत आणि नदीकाठी स्वच्छतेवेळी पाण्यात आणि काठावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा साठा आढळला. भविष्याच्या पिढीसाठी हे अत्यंत घातक आहे. हा कचरा पुन्हा नदीत जाऊ नये, यासाठी कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावत आहोत. भविष्यात उल्हास नदीच्या संवर्धनासाठी संस्था बदलापूर शहरात विविध उपक्रम राबवेल. तत्पूर्वी बदलापूरकरांना प्लॅस्टिकचा वापर कमी करा, असे आवाहन करीत आहे.
- नंदकुमार पवार, वनशक्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.