एकदा सत्ता द्या, विकास कामे करून दाखवितो

एकदा सत्ता द्या, विकास कामे करून दाखवितो

Published on

एकदा सत्ता द्या, विकासकामे करून दाखवितो
आमदार महेंद्र दळवी यांचे रोहेकरांना भावनिक आवाहन
रोहा, ता. २९ (बातमीदार) ः माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुरूडच्या जनतेने नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात दिली. माझ्याबद्दल त्या वेळी अनेकांच्या मनामध्ये शंका होती, मात्र मी निवडणुकीत मुरूडकरांना दिलेला शब्द पाळून पाच पट अधिक विकासकामे करून दाखविली. मागील पाच वर्षांत ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आणून मुरूड शहराचा कायापालट केला. मी रोहेकर जनेतेलादेखील विनंतीवजा आवाहन करतो की, फक्त दोन वर्षांकरिता मला नगरपालिकेत काम करण्याची संधी द्या. तटकरेंपेक्षा १०० पट अधिक निधी आणून रोहे शहराचा चेहरामोहरा बदलणार, असे भावनिक आवाहन शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.
रोहा शासकीय विश्रामगृहात रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रकाश कोळी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे, ग्राहक संरक्षण कक्षाचे विजय बोरकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष उस्मान रोहेकर, उद्देश वाडकर, संदेश मोरे, मंगेश रावकर, निलेश वारंगे, समीर घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजित कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा दमदार बॅटिंग करत खरपूस समाचार घेतला. अलिबाग नगरपालिकेत सत्ता नसताना २०० कोटींचा विकास निधी दिला. शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे आपल्याला विकास निधी कमी पडणार नाही. माझा रोहे नगरपालिकेवरदेखील लक्ष आहे. तटकरे जसे जादूची कांडी फिरवतात त्यांच्यापेक्षा वरची कांडी माझ्या हातात निश्चित आहे. आता सगळ्या गोष्टी खोलून सांगणार नाही. हातचा राखून बोलतोय, मात्र जेव्हा स्फोट होईल, तेव्हा त्यांना नक्कीच हदरा बसणार. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. माझ्या सकट मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तटकरेंच्या राष्ट्रवादीसोबत युती कदापी जमणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे तटकरे सोडून जे सोबत येथील त्यांना जवळ घ्या. येत नसतील तर एकला चलोचा नारा देत स्वबळावर लढण्याची हिंमत बाळगा, असे आवाहन आमदार दळवी यांनी केले. सर्व आपल्याच घरात पाहिजे म्हणून पालकमंत्रिपदाचा तिडा सुटत नाही, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com