किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा

किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा

Published on

किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा
३६६ मशालींच्या प्रकाशाने गड उजळून निघाला; पावसातही शिवभक्तांचा उत्साह
पोलादपूर, ता. २९ (बातमीदार) ः किल्ले प्रतापगडावर दरवर्षी साजरा होणारा मशाल महोत्सव यंदाही हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात गडावर ३६६ मशाली पेटवल्याने संपूर्ण गड प्रकाशमय झाला. सततचा पाऊस आणि प्रतिकूल हवामान असूनही शिवभक्तांचा उत्साह कमी झाला नाही.
२०१० पासून चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा सोहळा अखंडितपणे गेली १६ वर्षे पार पडत आहे. यंदाही पावसाचा जोर कायम होता, शिवाय आंबेनळी घाटामध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे प्रवास अधिक कष्टप्रद झाला. तरीही हजारो भाविकांनी अडथळे पार करून गडावर हजेरी लावली. गडावरील पायऱ्या संपूर्ण चिखलांनी माखल्या होत्या. पार्किंगची परिस्थिती इतकी भयावह होती की गडाच्या पार्किंगपासून ते शिवदुर्ग धाबा, प्रतापगड माची हस्तकला केंद्रापर्यंत वाहनांची रांग लागली होती. त्‍यामुळे एवढ्या पावसात मशाली कशा पेटतील, असा सवाल भक्‍तांच्या मनात आला, मात्र यातील काही मशाली पेटल्या नाहीत, तर बहुतेक अधिक तेजाने झळाळून उठल्या. या सुवर्णक्षणाचे सर्व उपस्थितांनी थरारक दर्शन घेतले. मशालींच्या प्रकाशाने गडावर निर्माण झालेला नजारा जणू एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देणारा होता. या वेळी मशाल महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी भोजन व महाप्रसादाची व्यवस्था चोखपणे केली होती. प्रतापगडाचा हा मशाल महोत्सव फक्त धार्मिक नव्हे, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे. दरवर्षी वाढत्या भक्तसंख्येसह या सोहळ्याचा भव्यपणा वाढत असून, किल्ला प्रतापगड पुन्हा एकदा शिवभक्तांच्या जयघोषाने आणि मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com