लोखंडी इच्छाशक्तीचा आयर्नमॅन हार्दिक पाटील
हार्दिक पाटीलचा भीमपराक्रम
३९ वेळा आयर्नमॅनची स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण
नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : आजच्य काळात तरुण पिढी समाजमाध्यमाच्या चक्रव्यूहात अडकून पडली आहे. एआयने तर तरुणाईला वेड लावले आहे, पण विरारच्या हार्दिक पाटील या तरुणाने सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.
नुकतीच आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ ही स्पर्धा फ्रान्समध्ये पार पडली. ही स्पर्धा अवघ्या १६ तास ५ मिनिटांत विक्रमी वेळेत हार्दिक पाटीलने पूर्ण करून आपल्या कारकिर्दीतील ३९ वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. हार्दिकच्या या यशाने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जगभरात सर्वात आव्हानात्मक आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणं हेच एक मोठं यश मानलं जातं, मात्र विरार पश्चिम डोंगरपाडा येथे राहणाऱ्या हार्दिक पाटील याच्यासाठी ही स्पर्धा केवळ स्पर्धा नाही, तर ती एक जीवनशैली बनली आहे. आयर्नमॅन स्पर्धा ही एक ट्रायथलॉन स्पर्धा असते, यामध्ये स्पर्धकांना सलगपणे ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन धावणे अशी आहे. या तीन क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धा पूर्ण करावी लागते. हे सर्व एका दिवसात, विशिष्ट वेळेत पूर्ण करणं हे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक क्षमतांची कसोटी असते. हार्दिक पाटील यांनी ही कसोटी ३९ वेळा उत्तम रीतीने पार केली आहे. ही बाब केवळ भारतीय क्रीडाजगतात नव्हे, तर जागतिक आयर्नमॅन समुदायातही अभिमानाने नोंदवली जाते.
आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्रान्स २०२५ ची स्पर्धा फक्त क्रीडापटूंच्या ताकदीची आणि सहनशक्तीची परीक्षा नव्हती, तर हा एक अद्वितीय अनुभव होता. जो प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला. मी ही स्पर्धा १६ तास ५ मिनिटात पूर्ण केली आहे. या स्पर्धेने विविध देशांच्या क्रीडापटूंना एकत्र आणून, चांगल्या क्रीडा मूल्यांमध्ये एकता आणि समर्पण यांना प्रोत्साहन दिले. आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ ने हे सिद्ध केले की, सीमा ओलांडून, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आपल्याला कोणतीही अडचण पार करता येऊ शकते.
- हार्दिक पाटील, जागतिक आयर्नमॅन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.