भारतीय फुटबॉल संघाच्या विजयात वसईचा तारा चमकला
फुटबॉल संघाच्या विजयात वसईचा तारा चमकला
मंगोलियावर ३-० ने मात करत पहिला आंतरराष्ट्रीय विजय
विरार, ता. २९ (बातमीदार) ः भारतीय फुटबॉल संघाने नुकताच इतिहास रचला आहे. एएफसी फुटबॉल आशियाई चषक २०२६ पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने मंगोलियाचा ३-० असा दणदणीत पराभव करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय साजरा केला. संघासाठी हा विजय दुहेरी आनंदाचा ठरला, कारण हा केवळ पहिला विजयच नव्हता, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली क्लीन शीट (एकही गोल न स्वीकारता)देखील होती.
या अविस्मरणीय विजयाचा नायक ठरला तो वसईचा सीऑन डिसोझा. त्याने दोन महत्त्वपूर्ण गोल केले. कुवेत (१-४) आणि ऑस्ट्रेलिया (१-१०) विरुद्धच्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले होते. तथापि, तिसऱ्या सामन्यात खेळाडूंनी केवळ अभिमानासाठी खेळताना उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. या विजयासह भारताने गट अ मध्ये तीन गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा २५ स्थानांनी पुढे असलेल्या मंगोलियाने सामन्याच्या सुरुवातीला चेंडूवर ताबा मिळवला, परंतु भारतीय बचावफळीने शिस्तबद्ध खेळ करत त्यांना रोखून धरले. १७व्या मिनिटाला कर्णधार निखिल मालीचा शॉट मंगोलियाच्या गोलरक्षकाने अडवला, पण परत आलेल्या चेंडूवर सीऑन डिसोझाने संधी साधत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर मंगोलियाने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण भारतीय संघाने त्यांना यश मिळू दिले नाही. निखिल मालीने गोलरक्षकाला चकवून दिलेल्या पासवर डिसोझाने संघासाठी दुसरा गोल केला. दोन मिनिटांनंतर, ३५व्या मिनिटाला अमन शाहच्या पासवर अनमोल अधिकारीने गोल करत भारताच्या ३-० विजयावर शिक्कामोर्तब केले.
हा विजय आई-वडिलांना समर्पित
सीऑन डिसोझा म्हणाला, हा एक अद्भुत क्षण आहे. मला माझा आणि माझ्या संघाचा खूप अभिमान आहे. हा आमचा पहिला आंतरराष्ट्रीय विजय आहे आणि त्यात मी दोन गोल करून योगदान देऊ शकलो, याचा मला खूप आनंद आहे. मी माझे प्रशिक्षक, संघ सहकारी, सपोर्ट स्टाफ आणि कुवेतमधील भारतीय चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. मी माझे हे गोल माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो.
वसई-विरारसाठी अभिमानाची बाब
या विजयाचा शिल्पकार आणि भारतीय फुटबॉल विश्वातील उगवता तारा सीऑन डिसोझा हा वसईच्या मातीतील खेळाडू आहे. सीऑन याचे वडील व्हिक्टर डिसोझा हे वसई विरारचे सहाय्यक आयुक्त असून, सध्या ते पेल्हार प्रभाग समितीत कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.