उघड्या चेंबरमध्ये पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

उघड्या चेंबरमध्ये पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Published on

उघड्या चेंबरमध्ये पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
डोंबिवलीत भंडाऱ्याचे जेवण करायला गेले, पण काळाने घाला घातला

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः नवरात्रोत्सव सुरू असल्याने भंडाऱ्याचे जेवण करायला ते गेले होते. जेवण झाल्यावर तेथून निघत असताना आयुषचा पाय उघड्या चेंबरमध्ये पडला आणि तोल जाऊन त्यामध्ये कोसळला. त्याला वाचवण्यासाठी वेदांतने नाल्यात उडी मारली; पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले आणि आयुषचा मत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात रविवारी (ता. २८) रात्री ही घटना घडली. या घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे.
देवीचा पाडा परिसरात शांताराम निवासमध्ये आयुष कदम (वय १३) हा कुटुंबासह राहण्यास आहे. येथील जगदंबा माता मंदिर परिसरातून भरत भोईर नाला वाहतो. या नाल्याच्या जवळच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे रिंगरोडचे काम सुरू आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास येथील जगदंबा माता उत्सव मंडळाचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. आयुषसह इतर मुलांनी भंडाऱ्याचे जेवण केले आणि ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी निघाले. याचदरम्यान येथील नाल्यावरील उघडे झाकण आयुषच्या निदर्शनास आले नाही. तो तोल जाऊन या चेंबरमध्ये पडला. आयुष पडताच त्याच्यासोबतच्या मुलांनी आरडाओरडा केला. ही ओरड ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती महापालिका, अग्निशमन दलाला देण्यात आली; मात्र ते लवकर येत नसल्याने येथील स्थानिक वेदांत जाधव याने नाल्यात उडी मारून आयुषचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाने नाल्याच्या खाडी मुखाजवळ जाळी लावून प्रकाशझोतात आयुषचा शोध सुरू केला. अखेर तासाभराने आयुष हाती लागला. त्याला स्थानिकांनी तत्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयुष स्वामी विवेकानंद शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या ठिकाणच्या भोजन भंडारा प्रसादाच्या पत्रावळी या चेंबरमधून नाल्यात टाकल्या जात होत्या. बॅरिकेड्सदेखील बाजूला करून ठेवले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

पालिकेची हलगर्जी!
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या आयुषच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. ते म्हणाले, की प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आयुषचा मृत्यू झाला आहे. येथे रिंगरूटचे काम सुरू आहे. या ठिकाणी नाल्यावरील झाकणे सुस्थितीत आहेत की नाही, हे बघण्याची जबाबदारी पालिकेची आहे. पीडित कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com