भिवंडीत शेतकऱ्यांमध्ये हर्षोल्हास

भिवंडीत शेतकऱ्यांमध्ये हर्षोल्हास

Published on

संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. २९ : गुजरात येथील खवडा सौरऊर्जा प्रकल्पातून उत्पादित वीज भिवंडीतील पडघा उपकेंद्रात वाहून नेण्यासाठी खावडा ४सी ट्रान्समिशन कंपनीकडून वीजवाहिनी टाकण्याचे आणि टॉवर उभारणी करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकारी स्तरावर घेण्यात आला आहे. लवकरच यासंबंधी अधिकृत अधिसूचना जारी होणार आहे. काही ठिकाणी ही नुकसान भरपाई मागील तुलनेत २० पट जास्त आहे. विशेष म्हणजे भरपाई मिळाल्यानंतरही जमिनीचा मालकी हक्क शेतकऱ्यांकडेच राहणार आहे. त्या जमिनीचा वापर शेतीसाठी करता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खावडा ते पडघा उच्चदाब वीजवाहिनीचे काम खावडा ४सी ट्रान्समिशन कंपनीकडून केले जात आहे. यासाठी पालघर (जव्हार, विक्रमगड, वाडा) आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात अनेक टॉवर उभारले जाणार आहेत. आधी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर नाराजी व्यक्त केल्यामुळे पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांनी सरकारशी सातत्याने चर्चा करून शेतकऱ्यांना वाढीव दर मिळवून दिले.
शासकीय पातळीवर झालेल्या बैठकीत खावड़ा ४सी ट्रान्समिशन कंपनीने वाढीव मोबदला देण्यास पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या चर्चेतून शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे सुधारित दर निश्चित करण्यात यश मिळवले आहे. आता शेतकऱ्यांना स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या सुधारित दरांनुसार नुकसान भरपाई देणार आहे. हे दर आधीच्या तुलनेत तब्बल १५ ते २० पट जास्त असल्याने दरवाढीमुळे भरघोस नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे.

भिवंडीत ३,३०० प्रति चौ.मी. दर
पूर्वी शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई फारच कमी होती आणि गावांनुसार यात मोठा फरक होता. भिवंडी तालुक्यात जमीन नुकसानभरपाईचा सरासरी दर याआधी फक्त ६००-७०० रुपये प्रति चौ. मीटर होता. शासकीय नोंदींनुसार खारिवली गावासाठी १३१ रुपये, खालिंग बु. गावासाठी २२३ रुपये आणि दळे पाडा गावासाठी ३२३ रुपये प्रति चौ. मी. भरपाई दिली जात होती. नव्या प्रस्तावानुसार भिवंडी तालुक्यातील सर्व गावांना एकसमान ३,३०० रुपये प्रति चौ. मी. दराने नुकसानभरपाई मिळणार आहे.

विक्रमगडमध्ये ६२७ प्रति चौ.मी. भरपाई
विक्रमगड तालुक्यात काही गावांना आधी फक्त २०० रुपये आणि वडपोली व बेलापूर गावांना फक्त ५० रुपये प्रति चौ. मी. दर मिळत होता; आता सर्व गावांना एकसमान ६२७ रुपये प्रति चौ. मी. भरपाई दिली जाणार आहे. हा दर रेडी रेकनरच्या आधीच्या दरापेक्षा पाच ते सहा पट जास्त आहे. काही ठिकाणी आधीच्या दरांच्या १०-१२ पट इतका आहे.

वाड्यात १,२५३ प्रति चौ. मी मिळणार
वाडा तालुक्यातही आधी नुकसानभरपाईचे दर ४०० रुपये प्रति चौ. मी. पेक्षा कमी होते. ससाणे गावाला फक्त १४४ रुपये आणि मुंगुस्से गावाला १६५ रुपये प्रति चौ. मी. भरपाई मिळत होती. आता या सर्व गावांना एकसमान १,२५३ रुपये प्रति चौ. मी. दराने नुकसानभरपाई मिळणार आहे.

जव्हारमध्ये २० पट जास्त दर
जव्हार भागात आधी रेडी रेकनरचा सर्वाधिक दर फक्त १५.६५ रुपये होता. मात्र खावड़ा ४सी ट्रान्समिशन कंपनीने आता सर्व प्रभावित गावांतील शेतकऱ्यांना एकसमान २४४ रुपये प्रति चौ. मी. दराने नुकसानभरपाई देण्याचे ठरवले आहे, जो आधीच्या दराच्या सुमारे २० पट जास्त आहे.

शेतकऱ्यांचा मालकी हक्क सुरक्षित
वाढीव नुकसानभरपाईनंतरही शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम राहणार आहे. टॉवर उभारणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पुन्हा त्याच जमिनीवर शेती करू शकतील. याशिवाय, टॉवर उभारणीदरम्यान पिकांचे नुकसान झाल्यास त्याची स्वतंत्र भरपाई दिली जाईल. ज्या शेत जमिनीवरून वीजवाहिन्या जातील, त्या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळणार आहे. त्यांच्या शेती किंवा इतर उपजीविकेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com