संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करा
राज्यातील साहित्यिकांनी केले आवाहन

संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करा राज्यातील साहित्यिकांनी केले आवाहन

Published on

संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करा
राज्यातील साहित्यिकांनी केले आवाहन
मुंबई, ता. ३० ः मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात होत असलेल्या भयावह अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी राज्यातील साहित्यिकांनी मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात अनेक साहित्य‍िकांनी आपला निधी मुख्यमंत्री मदत निधीसाठी जाहीर केला आहे, तर काहींनी तो निधी पाठविण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन केले असून, त्यात राज्यातील साहित्य आणि त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांनी राज्यात सध्या संकटात सापडलेल्या आपल्या पोषणकर्त्या बळीराजाच्या मदतीसाठी समोर येऊन मदतीचा हात द्यावा, असे त्यात नमूद केले आहे. यात प्रामुख्याने ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, भारत सासणे, अर्जुन डांगळे, प्रेमानंद गज्वी, अशोक नायगावकर, डॉ. महेश केळुसकर, ॲडव्होकेट राजेंद्र पै, डॉ. सुलभा कोरे, अभिराम भडकमकर, श्रीकांत बोजेवार, मुरलीधर नाले, अशोक मुळे, अशोक राणे आदींनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, हाताशी आलेली पिके वाया गेली. इतकेच नव्हे तर त्यांची गुरेढोरे व संसाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचा आक्रोश हेलावून टाकणारा आहे. ‘आभाळ फाटले, ठिगळं तरी किती लावणार!’ असं म्हणून चालणार नाही. लिहित्या संवेदनशील हातांनी आपल्या या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती मदत केली पाहिजे, असा विचार करून ९९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी रुपये एक लाख मुख्यमंत्री मदत निधीला दिले आहेत. तसेच मदतीसाठी राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक आदींनी समस्त लेखन बिरादरीला आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री निधीला मदत देण्याचे आवाहन
आपणही आपल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती मदत मुख्यमंत्री निधीला आजच पाठवून देऊया. आपल्या नातेवाइकांना आणि मित्रमंडळींनाही तसे करायला सांगूया. यासाठी साहित्यिकांनी https:/cmrf.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन Online Donation हा पर्याय निवडा, असेही आवाहन केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com