घर खरेदीपूर्वी सावधान!
घर खरेदीपूर्वी सावधान!
बेकायदा इमारतींचे सिडको वीज, पाणी जोडणी तोडणार
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : बेकायदा इमारतीतील सदनिका अथवा दुकान खरेदीदारांना कायदेशीर हक्क राहणार नाही. अशा खरेदीमुळे आर्थिक नुकसान झाले, तर त्यासाठी फक्त विकसक जबाबदार असेल. खरेदीदारांनी कोणतीही सदनिका घेण्यापूर्वी जमिनीचा मालकी हक्क, सिडकोकडील बांधकाम परवानगीची पडताळणी बंधनकारक असल्याचा इशारा सिडकोने घरे खरेदीदारांना दिला आहे.
सिडकोच्या भूमापकांच्या पाहणीत अनेक ठिकाणी अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर परवानगीशिवाय बांधकामे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बांधकामधारकांना मालकी हक्क, बांधकाम परवानगीचे कागदपत्र सादर करण्यासाठी सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत, मात्र अनेकांकडे सबळ कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला, मालमत्ता कर पावती, वीज, पाणी देयकांचे दस्तावेज जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे बेकायदा बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे सिडकोची कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या आदेशांतून शिक्कामोर्तब झाल्याने सिडको अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होणार आहे.
-----------------------------------
नोंदणी निबंधकांना सूचना
- महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०२३ नुसार, सिडकोच्या जमिनीवर उभारलेल्या बेकायदा इमारतींतील सदनिका, दुकाने, कार्यालये यांची विक्री/हस्तांतरण दस्तांची नोंदणी होणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. अशा बेकायदा दस्तांची नोंदणी केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार असून, ठाणे, रायगड जिल्ह्यातील निबंधक कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- सिडकोच्या भूखंडावरील बांधकामांवरील तोडक कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च, उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशा बांधकामांचे पाणी, वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे घर खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन सिडकोने केले आहे.
------------------------------------------
परवानगीशिवाय बांधकाम करणाऱ्याविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच संबंधितावर अतिक्रमण, फसवणूक, सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा कलमाखाली कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको