प्रतापगडवासिनी भवानी माता
प्रतापगडवासिनी भवानी माता
-देवेंद्र दरेकर, पोलादपूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधलेले किल्ले दुर्गस्थापत्याचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यापैकी एक अशा अभेद्य प्रतापगडाबद्दल मराठी माणसाच्या मनात आगळेवेगळे महत्त्व आहे. कारण याच किल्ल्यावर स्वराज्यावर अफझलखानाच्या रूपातील संकट महाराजांनी परतवून लावले होते. या गडावरील श्री भवानी मातेचे मंदिर शिवप्रेमींसाठी श्रद्धास्थान आहे.
--------------------------------
स्वराज्याला संपवण्याचा विडा उचलून विजापुराहून निघालेल्या अफझलखानाने मराठ्यांचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या भवानीची मूर्ती आणि मंदिर भग्न केले. याच अफझलखानाचा प्रतापगडाखाली महाराजांनी वध केला. त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना प्रतापगडावर करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार मंबाजी नाईक-पानसरे यांनी हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात जाऊन हिमालयातील त्रीशुलगन्डकी, श्वेतगंडकी, सरस्वती नद्यांच्या संगमातून शाळीग्रामची उत्तम शिला मिळवली. मूर्ती घडवण्यासाठी त्याच प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून तुळजाभवानीमातेच्या मूर्तीच्या मूळ प्रतिकृती घडवण्यात आली. साधारण दोन फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीच्या मस्तकावरील मुकुटावर शिवलिंग असून, भवानीमाता अष्टभुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. देवीच्या आठही हातांत शस्त्रे आहेत. डाव्या, उजव्या बाजूला सूर्य-चंद्र झळकत आहेत. शिवरायांच्या आज्ञेवरून मोरोपंतांच्या हस्ते जुलै १६६१ मध्ये समारंभपूर्वक देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराजांनी श्री भवानी देवीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र संस्थानच स्थापले. भवानी मातेची पूजाअर्चा, उत्सवाबद्दलची पद्धत घालून दिली. महाल, मोकासे, सनदा देऊन देवीच्या संस्थानाच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हवालदार, मुजुमदार, पेशवे, फडणीस, पुजारी, सेवेकरीची वंशपरंपरेने नेमणुका करून दिल्या. महाराज स्वत:ला देवीचे भोपे म्हणजे पुजारी म्हणवत. या भोपेपणाची मुतालिकी म्हणजे प्रतिनिधित्व मंबाजी नाईक पानसरे यांना देण्यात आली.
-----------------------------------------
उत्सवाची ४७ वर्षांची परंपरा
सातारा, कोल्हापूरच्या राजघराण्यांची ही माता कुलदैवत आहे. नवरात्रात चौथ्या माळेला रात्री प्रतापगडावर महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो शिवप्रेमी येतात. देवीच्या देवळाभोवती पारंपरिक वेशभूषा करून पेटत्या मशाली घेऊन देवीची पदे म्हणतात. रात्रभर नाचत जागर केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. ४७ वर्षे अव्याहतपणे ही परंपरा सुरू आहे. गेली तीन वर्षे गडाच्या तटबंदीवर साडेतीनशे मशाली लावून गड उजळवण्यात येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.