कल्याण अवती भवती
आगरी युथ फोरमच्या अध्यक्षपदी पुन्हा गुलाबराव वझे
कल्याण (वार्ताहर) ः आगरी समाजाच्या उन्नतीसाठी मागील ३६ वर्षे कार्यरत असलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेची वार्षिक सभा रविवारी (ता. २८) पार पडली. संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आगरी महोत्सव कार्यालयात झाली. या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यावर चर्चा झाली. उपस्थित सर्व सभासदांनी विद्यमान अध्यक्ष गुलाबराव वझे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचीच पुढील कार्यकाळासाठी पुन्हा अध्यक्षपदी निवड केली. तसेच, संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सव २०२५च्या अध्यक्षपदासाठी शरद पाटील यांची निवड करण्यात आली. यंदा हा २१वा महोत्सव डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहे. गुलाबराव वझे यांनी शरद पाटील यांच्या नावाची शिफारस केली, जी सर्वानुमते मंजूर करण्यात आली. ही सभा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, संस्थेच्या भविष्यातील कामगिरीसाठी सकारात्मक दिशा देणारी ठरली आहे.
..............................
महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचा गौरव
कल्याण (वार्ताहर) : जोखमीच्या वीज क्षेत्रात कार्यरत असलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचा नवरात्रीच्या निमित्ताने ‘सौदामिनी’ या उपक्रमांतर्गत गौरव करण्यात आला. तेजश्री इमारत, कल्याण परिमंडळ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते महिला अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. मिश्रा यांनी महिलांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत सांगितले, की आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. या वेळी कौमुदी परदेशी, स्मिता काळे, सावनी मालंदकर, शर्वरी पाटील, स्मिता साळुंखे, पौर्णिमा उदावंत, मयूरी बोरसे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमास विजय फुंदे, अनिल थोरात, सुशील पावसकर, रामगोपाल अहिर यांचाही सहभाग होता. सूत्रसंचालन स्मिता पेवेकर यांनी केले. हा उपक्रम महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायक नमुना ठरला.
...................
महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक समालखाला रवाना
कल्याण (वार्ताहर) ः ७८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा उपक्रम समालखा (हरियाना) येथील निरंकारी आध्यात्मिक स्थळी रविवारी (ता. २८) झाला. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमितजी यांच्या हस्ते सेवा प्रारंभ झाला. हा संत समागम ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला असून, देशभरातून हजारो सेवादल स्वयंसेवक समालखाला रवाना झाले आहेत. आयोजनाच्या पूर्वतयारीच्या सेवांमध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण देशातीलच नव्हे तर मुंबई व महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने सेवादल स्वयंसेवक व अन्य सेवादार भक्त समालखास्थित निरंकारी आध्यात्मिक स्थळाकडे रवाना झाले आहेत. या वेळी सद्गुरु म्हणाल्या, प्रत्येकामध्ये परमात्म्याचे रूप पाहा, अहंकार न ठेवता सेवा करा. ६०० एकर परिसरात पसरलेले हे स्थळ श्रद्धा, सेवा व समर्पणाचे प्रतीक आहे. लाखो भाविकांच्या निवास, भोजन, वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षेच्या सुविधा पूर्ण भक्तिभावाने दिल्या जातात. यंदा समागमाचे शीर्षक ‘आत्ममंथन’ ठेवले असून, त्यातून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश दिला जात आहे. हा उत्सव सर्व धर्म व जातीतून आलेल्या श्रद्धाळूंना एकत्र आणतो.
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.