स्वातंत्र सैनिकांचे गाव विकासापासून वंचित
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १ : नायगाव आणि भाईंदरमध्ये असलेल्या बेटावरील गाव म्हणजे पाणजू. या गावाला जाण्यासाठी बोटीतून अथवा रेल्वे मार्गिकेवरून नायगाव किंवा भाईंदर स्थानक गाठावे लागते. धावत्या रेल्वेमधून निर्माल्य फेकल्याने नुकताच संजय भोईर या २५ वर्षीय तरुणाचा बळी गेला. केंद्र सरकारच्या बेट विकास अभियानामध्ये पाणजूचा कायापालट करण्यात येणार असल्याचे स्वप्न दाखवले होते; परंतु तेही गेल्या १५ वर्षांनंतर हवेत विरले आहे. आतापर्यंत या गावातील १५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण अपघातात जखमी झाले आहेत. त्यामुळे या गावातील समस्या पुन्हा समोर आल्या आहेत.
पाणजू बेटाने देशासाठी २१ स्वातंत्र्यसैनिक दिले. अटल बिहारी वाजपेयी यांनी गाव सडक योजना आखली, पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतानाही सरकार गावाला रस्ता देऊ शकले नाही. छोट्या बोटीची व्यवस्था असली तरी रात्री-अपरात्री रेल्वे रुळावरून अंधारातून चालत येताना काही जण पडून गंभीर दुखापतग्रस्त झाले आहेत. तरीची (होडी) व्यवस्था १९९०मध्ये कमलाकर भाऊ भोईर यांनी सुरू केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणजू गावच्या विकासाला गती मिळाली. पावसाळ्यात हा जीवघेणा प्रवासाचा असतो. २०००पर्यंत गावात शिक्षणाची व्यवस्था नसल्याने कोणीही पालक पाल्यास शिक्षण देण्यास धजत नव्हते. २०००मध्ये श्री संत ज्ञानेश्वर सरस्वती विद्यामंदिरची स्थापन झाल्यानंतर गावात शिक्षणाची सोय झाली. आजपर्यंत ४५० विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. माध्यमिक विभागाने उल्लेखनीय काम करून गेल्या २५ वर्षांत शिक्षणाचा दर्जा टिकविला. विविध क्षेत्रांत शिक्षण घेऊन आज गावात पदवीधरांचा आकडा शंभरी पार गेला आहे. आज संपूर्ण गाव साक्षर आहे, मात्र जिल्हा परिषद मराठी शाळा अद्ययावत नाही. परिसर स्वच्छ होत नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावत नाही, हे कटू सत्य आहे.
आई जेवू घालत नाही अन् बाप भीक मागून देत नाही, अशी अवस्था पाणजू गावातील नागरिकांची झाली आहे. वसई तालुक्यातून सर्वात जास्त स्वातंत्र्यसैनिक दिलेल्या गावाला आजही रस्त्यासाठी सरकारकडे साकडे घालावे लागत आहेत. सुविधांअभावी अजून किती जणांचा बळी जाणार, असा प्रश्न नागरिक आता विचारत आहेत.
गाव-खेडी सशक्त करायची असल्यास दुर्गम भागातील शाळांना प्राधान्याने विचार करून अनुदान देण्यात यावे. प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य देऊन प्राथमिक शाळा अद्ययावत व्हायला हव्यात, तरच सर्व शिक्षा अभियान सार्थ ठरेल. निवडणुका आल्या की रो-रो सेवा, पर्यटन विकास, विविध पुलांचे आराखडे यांचे गाजर दाखविले जाते. त्यानंतर ये रे माझ्या मागल्या.
- देवेंद्र भोईर, पाणजू
पाणजू गावातील नागरिकांचे प्रश्न आतापर्यंत सुटायला हवे होते, परंतु दुर्दैवाने सुटलेला नाही. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे.
- स्नेहा दुबे-पंडित, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.