शहरातील चौक बॅनरबाजीच्या विळख्यात

शहरातील चौक बॅनरबाजीच्या विळख्यात

Published on

शहरातील चौक बॅनरबाजीच्या विळख्यात
शहराचे विद्रूपीकरण, दिशादर्शक फलक दिसत नसल्याने नागरिकांची गैरसोय
वाशी, ता. ३० (बातमीदार)ः नवी मुंबई शहरात नवरात्रोत्सव मंडळांनी रस्त्यांवर शुभेच्छा आणि स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत. विनापरवाना बॅनरबाजी करणाऱ्या राजकारण्यांनी चौकाचौकात अनधिकृत शुभेच्छा बॅनर उभारले आहेत. विशेष म्हणजे दिशादर्शक फलकांवरदेखील बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्या नागिरकांना दिशादर्शक फलकच दिसत नसल्याने त्यांचीदेखील गैरसोय होत आहे. या अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण वाढले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, पण पालिकेचे अधिकारी अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बॅनर लावण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण नवी मुंबईतील राजकीय कार्यकर्ते पालिकेची परवानगी न घेताच शहरभर अनधिकृतपणे बॅनरबाजी करतात. या अनधिकृतपणे लावण्यात येत असलेल्या बॅनरमुळे शहर विद्रूप होत असून, पालिकेचा महसूलदेखील बुडत आहे. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुका बघता राजकीय नेत्यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जोरदार बॅनरबाजी केली आहे. अनधिकृत बॅनरबाजी करण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हात असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते या अनधिकृत बॅनरबाजीबद्दल ब्रदेखील तोंडातून काढत नाहीत. नवी मुंबईतील एखाद्या चौकातून जात असताना संपूर्ण चौकालाच बॅनरचा विळखा असल्याने नेमके कुठे जात आहोत याची विचारणा बाहेरून आलेल्या नागरिकांना करावी लागत आहे. बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत असून, पालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने परवानगी घेऊन प्रसिद्ध मिळवणाऱ्या मंडळांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असल्यामुळे छोटेमोठे अपघातदेखील घडत आहेत.

चौकट
बॅनरबाजी करणाऱ्यांची अनोखी शक्कल
मंडळांचे कार्यकर्ते हे पालिकेकडून एक बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतात, पण अनेक बॅनर लावतात. तसेच छोट्या आकाराच्या बॅनरची परवानगी घेतली जाते, पण मोठ्या आकाराचे बॅनर लावून पालिकेची फसवणूक करण्यात येत असल्याचे निर्दशनास येते.

चौकट
नवरात्रोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर शहरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून करण्यात येत आहे.
- डॉ. कैलास गायकवाड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त

Marathi News Esakal
www.esakal.com