उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य समस्या सोडविण्यात यश
उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य समस्या सोडविण्यात यश
मोफत उपचारामुळे आदिवासीबहुल भागातील महिलांना दिलासा
कर्जत, ता. ३० (बातमीदार) ः कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी पाच मातांनी कन्यारत्नांना जन्म दिला. एका दिवशी सुरळीत झालेल्या या पाच प्रसूतींमुळे रुग्णालय परिसरात आनंदाचे वातावरण आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. तसेच मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील विविध आरोग्य समस्या सोडविण्यात प्रशासनाला यश आल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांमुळे रुग्णांचे हाल होत होते. याप्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे स्त्रीरोग आणि भूलतज्ज्ञ यांची कमतरता जाणवत होती. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट पकडावी लागत होती. दरम्यानच्या काळात उपजिल्हा रुग्णालयात लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. आता येथे महिलांची प्रसूती मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या प्रसूतीसाठी शुल्क घेतले जात नसल्याने सामान्य रुग्णांना दिलासा मिळत आहे. त्यामुळे आदिवासीबहुल कर्जत तालुक्यातील महिलांना मोठा दिलासा मिळत आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी तातडीच्या प्रसूतीसाठी रुग्णांना खासगी दवाखाना किंवा अगदी उल्हासनगरसारख्या दूरच्या ठिकाणी हलवावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि त्रास या तिन्ही गोष्टींचा सामना करावा लागत होतास मात्र आता कर्जतमध्येच सुविधा उपलब्ध झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनोग्राफीची सुविधा सुरू झाल्याने गरोदर मातांना वेळेवर तपासणी करता येत आहे. तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसह कुटुंब नियोजन, डायलिसिस सेवा आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, पंतप्रधान जनआरोग्य योजना, मातृत्व वंदना योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. सध्या या रुग्णालयात दरमहा साधारण ४० ते ५० सामान्य प्रसूती होत आहेत. कर्जत तालुका आदिवासीबहुल तालुका असून, आदिवासी समाजातील जनतेला या सुविधांचा फायदा होत आहे.
....................
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम बंद असलेले ऑपरेशन थिएटर पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग आणि भूलतज्ज्ञ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जतमध्ये गरोदर मातांना मोठा दिलासा मिळत आहे. याचबरोबर इतर आजारांवरील शस्त्रक्रियाही रुग्णालयात सुरू करण्यात आल्या आहेत. गरोदर मातांसाठी दर सोमवार आणि गुरुवारी मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दर गुरुवारी पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी केली जाते. गरोदर मातांनी उपजिल्हा रुग्णालयात नावनोंदणी करून या सुविधा घ्याव्यात.
- डॉ. विजय मस्कर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कर्जत