डोंबिवली रेल्वे स्थानकातून नावच गायब
रेल्वेस्थानकातून डोंबिवलीचे नाव गायब
शिवसेना ठाकरे गटाते रेल्वेला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : मागील वर्षभरापासून डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात विविध कामे सुरू आहेत. स्थानक नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम करताना स्थानकाचे जणू नव्याने नामकरण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. स्थानकात नव्याने आठ प्रवेशद्वार बसविले आहेत; मात्र त्यात एकाही प्रवेशद्वारावर डोंबिवली नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे नागरिकांच्या मुख्यतः बाहेरून आलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. डोंबिवली स्थानकात डोंबिवली नावाची पाटी लावण्यात यावी, अशी मागणी माजी विभागप्रमुख प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देत केली आहे.
डोंबिवली स्थानक परिसराचे नूतनीकरण, डागडुजी, फलाट रुंदीकरण, वाढीव जिना, सरकते जिने पत्र्याचे शेड अशी अनेक कामे गेल्या एक दोन वर्षांपासून सुरू आहेत. या स्थानकाला पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत, परंतु या एकाही प्रवेशद्वारावर कुठेच डोंबिवली नावाचा उल्लेख नाही. आठही प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रीडानगरी, साहित्यनगरी, उद्योगनगरी, संगीतनगरी, एकतानगरी, कलानगरी लिहिलेली नावे ही डोंबिवली शहराला मिळालेल्या उपमा आहेत. उपमा मिळाल्या म्हणून आपण मूळ नाव मिटवू शकत नाही, असे ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख तथा कक्ष जिल्हा प्रसारक ठाणे ग्रामीणचे प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याकडे केली आहे. कांबळे यांनी त्यांची भेट घेत संबंधित अधिकारी वरिष्ठ मंडळ विद्युत इंजिनिअर शांतीलाल यांच्यासोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर डोंबिवली स्थानकात डोंबिवली हे नाव लिहावे. तसेच अनेक दिवसांपासून रेंगाळत चाललेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती या वेळी करण्यात आली. ही कामे लवकर न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, अशा इशारादेखील या वेळी देण्यात आला.