रेल्वे स्थानकांवर ५०० मि.ली. ‘रेल नीर’ गायब!

रेल्वे स्थानकांवर ५०० मि.ली. ‘रेल नीर’ गायब!

Published on

रेल्वे स्थानकांवर ५०० मि.ली. ‘रेल नीर’ गायब!
स्वस्त नको, पाणी उपलब्ध करून द्या, प्रवाशांचे आर्जव
मुंबई, ता. ३० ः मुंबईतील उपनगरीय रेल्वेस्थानकांवरून ५०० मि.ली. ‘रेल नीर’ बाटली गायब झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल नीरच्या दरात एक रुपयाची कपात करण्याची घोषणा केली असताना प्रत्यक्षात या छोट्या बाटल्यांची उपलब्धता जवळपास नसल्यामुळे स्वस्त नको मात्र बाटली उपलब्ध करून द्या, असे आर्जव मुंबईकरांचे आहे.
दररोज ७० लाख प्रवासी उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करीत असून, त्यापैकी अनेकांना ५०० मि.ली. आकाराची बाटली अत्यंत सोयीची पडते. पण मुंबईतील प्रमुख स्थानकांवरच्या स्टॉलवर त्याची उपलब्धता नाही. ‘सकाळ’ने प्रमुख रेल्वेस्थानकांवरील स्टॉलधारकांना विचारले असता, या बाटलीची मागणी केल्यावर स्टॉक उपलब्ध नसल्याचे वितरकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे आमचा नाइलाज असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज मोठ्या संख्येने छोट्या बाटल्यांसाठी मागणी असल्याचे त्यांनी मान्य केले.
‘रेल नीर’ची ५०० मि.ली. बाटली न मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांना एक लीटरची बाटली विकत घ्यावी लागते. मोठी बाटली बाळगण्यास प्रवाशांना त्रास होतो. प्रवाशांच्या सोयीसाठी छोटी ‘रेल नीर’ बाटलीच उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत असंख्य प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
आयसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सध्या ५०० मि.ली. बाटल्यांचे उत्पादन मर्यादित आहे. काही स्थानकांवर वंदे भारत एक्स्प्रेसमधून ही बाटली दिली जात आहे, पण उत्पादन वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये ही बाटली उपलब्ध केली जाईल.

सुट्ट्या पैशाचा जाच
रेल्वे प्रशासनाने रेल नीरच्या किमतीत प्रत्येकी एक रुपयाची कपात केली म्हणजे एक लिटरची बाटली १४ रुपयांना, ५०० मिलीची बाटली नऊ रुपयाला झाली; मात्र त्‍यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न अधिकच अवघड झाला आहे. विक्रेत्यांकडे सुट्ट्या पैशांचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांना दुसरी वस्तू घ्या, असे सांगितले जाते. त्‍यामुळे प्रवासी आर्थिकदृष्ट्या आणखी अडचणी येत आहेत.

लांब पल्ल्याच्या गाड्यांतही तुटवडा
लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्येही एक लिटर ‘रेल नीर’ उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना अनेकदा स्थानकावर उतरून रेल नीर विकत घ्यावे लागते. रेल्वे प्रशासन बाटलीच उपलब्ध करून देत नसेल, तर दर कमी करण्याचा उपयोग काय, असा प्रश्न प्रवाशांनी विचारला आहे.

मी दररोज लोकलने महाविद्यालयात जातो. ५०० मि.ली.ची बाटली घेतल्यास ती सोयीस्कर असते, पण रेल्‍वे स्‍थानकावर ती उपलब्ध नाही. प्रशासन केवळ घोषणांमध्ये व्यस्त आहे.
- साईल पाटील, विद्यार्थी

पाण्याच्या बाटल्यांचे दर कमी केले आहेत, परंतु सुट्टी नाणी नसल्यामुळे त्यातून वादाचे प्रसंग उभे राहतात.
- गणेश गायकवाड, नोकरदार

Marathi News Esakal
www.esakal.com