विमानतळाला विशेष पोलिस बळ
विमानतळाला विशेष पोलिस बळ
इमिग्रेशनसाठी प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी; पोलिस महासंचालकांचा निर्णय
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : लवकरच नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याने इमिग्रेशन चेकपोस्टसाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर मंजूर करण्यात आलेली २८५ पदे इतर रिक्तपदांसोबत आगामी पोलिस भरती प्रक्रियेत भरली जाणार आहेत. तोपर्यंत विमानतळ इमिग्रेशनचे कामकाज पाहण्यासाठी आवश्यक पोलिस बळ पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रतिनियुक्तीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विमानतळ पोलिस ठाणे (२१६ पदे) व वाहतूक विभागासाठी (१७७ पदे) पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असली तरी ही पदे रितसर भरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत नवी मुंबई पोलिस दलातील उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून विमानतळ पोलिस ठाणे व वाहतूक विभागाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. आवश्यक पोलिस कर्मचारी मंजुरीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे चार टप्प्यांत विस्तार होणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठी नवी मुंबई पोलिस दलाकडून कर्मचारी पुरवठा केला जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पांतर्गत चार प्रवासी टर्मिनल, दोन धावपट्टया, एक कार्गो टर्मिनल आणि इतर महत्त्वाच्या सुविधा उभारल्या जात आहेत. पूर्ण क्षमतेने विमानतळ कार्यरत झाल्यावर दरवर्षी नऊ कोटी प्रवासी आणि ३६० दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक या विमानतळावरून हाताळली जाणार आहे. त्यामुळे इमिग्रेशनसह सुरक्षेसाठी सक्षम पोलिस यंत्रणा तातडीने उभी करणे अत्यावश्यक ठरले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांमार्फत याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास सादर केला होता. या प्रस्तावात आढळलेल्या काही त्रुटींची पुर्तता करून तो पुन्हा शासनास सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शासन मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
......................
इमिग्रेशन चेकपोस्टकरिता २८५ पदे मंजूर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन चेकपोस्ट करिता २८५ पदे नव्याने निर्माण करण्यास राज्याच्या गृह विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तसेच या पदनिर्मितीकरिता तब्बल १० कोटी १० लाख ८८ हजाराच्या खर्चासदेखील मंजुरी दिली आहे. नवीन मंजूर करण्यात आलेल्या २८५ पदांमध्ये २० पोलिस निरीक्षक, ५५ पोलिस उपनिरीक्षक, ३० सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ६० हवालदार व १२० शिपाई, असे मिळून एकूण २८५ पदांचा समावेश आहे.
........................
नवी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन चेकपोस्टसाठी प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ पुरवण्याची प्रक्रिया पोलिस महासंचालक कार्यालयाद्वारे तातडीने सुरू झाली असून, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी राज्याच्या पोलिस दलातील इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. विमानतळ पोलिस ठाणे व वाहतूक विभागासह उलवे पोलिस ठाण्याकरिता मनुष्यबळ मंजुरीचा प्रस्तावदेखील शासनस्तरावर अंतिम टप्प्यात असून, विमानतळासाठी पोलिस दल सज्ज आहे, असे पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.