कष्टकरी महिलांची ओटी भरून सन्मान
कष्टकरी महिलांची ओटी भरून सन्मान
भाजपा महिला कार्यकर्त्यांचा उपक्रम
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : नवरात्रीच्या मंगलप्रसंगी योगीधाम परिसरातील कष्टकरी महिलांचा सन्मान करताना भाजपा कार्यकर्त्या पुष्पा रत्नपारखी यांनी १०८ भाजी विक्रेत्या, फळ विक्रेत्या व घरकाम करणाऱ्या महिलांची ओटी भरून त्यांना विशेष आदराची भावना व्यक्त केली. रोजच्या आयुष्यात अनेक अडथळ्यांशी सामना करत ही महिला मंडळी कधी संयमी, तर कधी रुद्ररूप घेऊन संघर्ष करताना देवीच्या नऊ रूपांप्रमाणेच जगत असतात. हा संदेश देत त्यांना समाजात त्यांच्या मेहनतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
पुष्पा रत्नपारखी म्हणाल्या, “या महिलांना त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटले. त्या आमच्यासाठी स्पेशल आहेत, हे सांगणं गरजेचं होतं.” भाजप महिला मंडळ अध्यक्षा भावना मनराजा, उषा दिसले, भक्ती साळवी, नयना नायर, सुनिता भागवत, संगीता घोलप, सीमा सिंग, शिल्पा रायकवार,जास्मिना लीलानी आदी महिला पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमातून महिलांच्या योगदानाची जाणीव व त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यात आला. समाजातील प्रत्येक कष्टकरी स्त्री ही आदरणीय असून, अशा महिला सन्मान उपक्रमातून त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरतो आहे.