प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे “सन्मान नवदुर्गांचा”
प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे “सन्मान नवदुर्गांचा”
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : शक्ती, भक्ती आणि सन्मानाचा संगम असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त प्राथमिक विद्यामंदिर, कर्णिक रोड, कल्याण येथे “सन्मान नवदुर्गांचा” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व देवी पूजनाने झाली. “तूच दुर्गा, तू भवानी” या गीतावर इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने वातावरण भक्तिमय केले. विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने आणि पाहुण्यांच्या मनोगतांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. इटकर, सुधा जोशी, मंजिरी फडके, स्वामिनी निष्कलानंदा, शिल्पा चव्हाण, सीमा गांगुर्डे, मीनल जोशी, दीपिका साळवे, पुष्पा पाडवी, आदिती चौधरी आदी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. या महिलांनी स्वास्थ्य, शिक्षण, अध्यात्म, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना सत्कारपूर्वक सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती शालेय समिती अध्यक्ष महेश देशपांडे, प्रमुख पाहुण्या वर्षा कोल्हटकर, सहाय्यक शिक्षिका उर्मिला जाधव, समिती सदस्य लक्ष्मण अग्रवाल, वसुधा पवार, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका
रेश्मा सय्यद, पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका साबळे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाने पार पडले. मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत पुढील पिढीसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.