मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ जिल्ह्यासाठी ठरणार फायदेशीर
‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ जिल्ह्यासाठी ठरणार फायदेशीर
साथरोगांवर ठेवता येणार नियंत्रण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : कोरोनासारख्या साथींवर वेळेत नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यानुसार मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट ठाण्यात स्थापन करण्यात येत असून, येत्या २ ऑक्टोबर रोजी त्याचा औपचारिक सुरुवात होणार आहे. हे युनिट केवळ ठाण्यापुरते मर्यादित नसून, संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी कार्यरत राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांवर वेळेत लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं शक्य होणार आहे.
कोरोना काळात ठाण्यासह जिल्ह्यात अनेक नागरिक बाधित झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशभर अशा सर्व्हेलन्स युनिट्स सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत अशा प्रकारचे युनिट यापूर्वीच सुरू झाले असून, आता ठाणे जिल्ह्यासाठी हे दुसरे युनिट कार्यान्वित होणार आहे. महापालिकेने यासाठी माजिवडा येथे जागा उपलब्ध करून दिली असून, त्या ठिकाणीच हे युनिट कार्यरत होणार आहे. एखाद्या आजाराची साथ उद्भवल्यास त्याचे मूळ शोधणे, प्रसार रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर या युनिटकडून लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या युनिटच्या स्थापनेमुळे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील संभाव्य आरोग्य आपत्तींना वेळेत तोंड देणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
..................................
महत्त्वाची पदे भरणार
वरिष्ठ पब्लिक हेल्थ तज्ज्ञ - १
पब्लिक हेल्थ तज्ज्ञ - १
मायक्रोबायोलॉजिस्ट - १
फूड सेफ्टी तज्ज्ञ - १
रिसर्च असिस्टंट - २
इतर सहाय्यक पदे - १७
......................................
खर्च केंद्र सरकारकडून
हा उपक्रम केंद्र सरकारच्या निधीतून राबवण्यात येणार असून, युनिटची देखभाल, तज्ज्ञांचा पगार आणि अन्य खर्च पूर्णपणे केंद्र सरकार उचलणार आहे. ठाणे महापालिकेची जबाबदारी केवळ जागा उपलब्ध करून देणे आणि भरती प्रक्रिया राबवणे इतकी मर्यादित असणार आहे. या युनिटसाठी प्राथमिक टप्प्यात तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाला आहे.