पावसामुळे  खडेगोळवली खड्डेमय

पावसामुळे खडेगोळवली खड्डेमय

Published on

खडेगोळवलीतील रस्त्यांची दुर्दशा
करदात्यांमध्ये नाराजी
कल्याण, ता. ३० (बातमीदार): नवरात्रोत्सव संपत आला तरीही खडेगोळवली परिसरातील रस्त्यांची खड्डेमय अवस्था कायम आहे. महापालिकेने मागील महिन्याभरापासून खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी काही ठिकाणी अजूनही रस्ते दुर्दशेच्या उंबरठ्यावर आहेत. रस्त्यांवर पडलेले खड्डे व दुरुस्ती न झाल्यामुळे येथील करदाते नागरिकही संतप्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे दुरुस्तीचे काम महापालिकेसाठी आव्हान ठरत आहे. ओलसर रस्त्यावर केलेली तात्पुरती डागडुजी टिकत नाही आणि पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे अनेक ठिकाणी बारंबार दुरुस्ती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांचा प्रश्न “खड्डे कधी १०० टक्के बुजवतील?” असा सवाल केला जात आहे.

सलग पाच महिने सुरू असलेल्या पावसाने यंदा शहरात सर्वत्र दाणादाण केली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले आहे. सतत पाऊस सुरू असल्याने डांबरीकरण करणे देखील महापालिका प्रशासनाला जिकरीचे बनले असून तात्पुरती केलेली डागडुजी देखील फार काळ तग धरू शकत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी महापालिकेला अनेक वेळा काम करावे लागत आहे. खडगोळवली परिसरातही डागडुजी केली असून आता पुन्हा खड्डे पडल्याने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाऊस थांबल्यानंतर पाहणी करून संपूर्ण नियोजन करून शक्यतो रात्रीच्या वेळात सर्व रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण केले जाणार असल्याचे ''५-ड'' प्रभागाचे सहाय्याक आयुक्त उमेश यमगर म्हणाले.

पाऊस थांबल्यानंतरच रस्ते कोरडे होईपर्यंत थांबावे लागेल. नंतरच दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी डांबरीकरण करणे शक्य होईल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “खड्डा भरण्याअगोदर खराब मटेरियल काढून टाकणे, चांगल्या प्रतीच्या मटेरियलने भराव करणे व नंतर योग्य डांबरीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून रस्ता टिकाऊ बनेल.”

गणेशोत्सवापूर्वी खड्डे दुरुस्तीचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी काही दुरुस्ती झाली, पण सततच्या पावसामुळे परिस्थिती पुन्हा खराब झाली. महापालिकेने पाऊस थांबल्यावर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्याचे माजी महापौर विक्रम तरे यांनी सांगितले. खड्ड्यांचे फोटो महापालिकेकडे पाठवले आहेत आणि तक्रारींवर पाठपुरावा सुरू आहे. मात्र काही दिवसांत भरावाचा मटेरियल पसरल्याने परिस्थिती आणखी वाईट होते. महापालिका म्हणते की येथे करदाते कमी आहेत, पण करदात्यांनाही अशी खड्डेमय अवस्था पाहून नाराजी वाटते, असे शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख जगदीश तरे यांनी सांगितले.

कामे मंदावली
खडेगोळवली परिसरातील रस्त्यांची समस्या अनेक महिन्यांपासून उभी असून, सध्याच्या पावसाळी हवामानामुळे दुरुस्ती प्रक्रिया मंदावली आहे. महापालिकेने तात्पुरते उपाय केले असले तरी सखोल आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे, अन्यथा करदात्यांचा रस्त्यांवरील विस्वास कमी होईल.

Marathi News Esakal
www.esakal.com