जे. जे. पाठोपाठ सेंट जॉर्जेस रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया
जे. जे. पाठोपाठ सेंट जॉर्जेस रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया
पहिल्यांदाच यशस्वी गुडघा सांधा प्रत्यारोपण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयानंतर आता सेंट जॉर्जेस रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयात प्रथमच रोबोटिक तंत्रज्ञानाने यशस्वी गुडघा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघा सांधा प्रत्यारोपण शस्रक्रियेची सोय आता गरजू रुग्णांना उपलब्ध होणार आहे
ही शस्त्रक्रिया मालाडच्या ६० वर्षीय रुग्णावर करण्यात आली. या रुग्णाला गेल्या १० वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता. त्यामुळे रुग्णाचा पाय गुडघ्याखाली तिरकस झाला होता. रुग्णाची तपासणी केल्यावर गुडघ्यातील सांध्यात वात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोबोटिक तंत्रज्ञानाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.
या शस्त्रक्रियेमुळे प्रत्यारोपित सांधा अचूकपणे बसवण्यात आला. ही शस्त्रक्रिया सेंट जॉर्जेस रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातील पथकप्रमुख डॉ. अमित सुपे यांनी केली. या शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, डॉ. नितीन महाजन, डॉ. नावेद अन्सारी, डॉ. पूर्णिमा सोनकांबळे यांचे सहकार्य लाभले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो. सरकारी रुग्णालयात सरकारी योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया केली.
मानवी चुका टाळता येतात
रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यातील सांधा अचूकपणे प्रत्यारोपित केला जातो. त्यातील मानवी चुका टाळण्यात येतात. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी होणे, शस्त्रक्रियेतील जखम कमी राहणे, वेगवान बरे होणे आणि प्रत्यारोपणाचा दीर्घ काळ टिकाव मिळणे यासारखे महत्त्वाचे फायदे होतात. रोबोटिक तंत्रज्ञान वापरून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणेदेखील आता शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया सेंट जॉर्जेस रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील पथक प्रमुख डॉ. अमित सुपे यांनी दिली.