वाडा-भिवंडी रस्त्यासाठी बेमुदत उपोषण
वज्रेश्वरी, ता. ३० (बातमीदार) : वाडा-भिवंडी रस्त्याच्या खड्डेमय दुरवस्थेविरोधात अखेर निर्णायक लढा उभारण्यात आला आहे. भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवार यांनी मंगळवारी (ता. ३०) अंबाडी नाका येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला विविध पक्ष, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, तसेच अनेक मान्यवरांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
उपोषणाच्या सुरुवातीला भाषण करताना पवार यांनी गेल्या १४ वर्षांचा इतिहास मांडला. २०११ पासून अनेक ठेकेदार आले. कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण रस्त्याचे काम रखडलेलेच आहे. या रस्त्याने अनेक जीव घेतले. नेहा शेख या तरुणीचा मृत्यू खड्ड्यामुळे झाला होता. जनता कर भरते, मग चांगला रस्ता मिळणे हा तिचा हक्क नाही का, असे बोलताना पवार भावूक झाले. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी परिसरातील शेकडो महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. ‘रस्ता आमचा हक्काचा आहे’, ‘भ्रष्ट ठेकेदार हद्दपार करा’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश सावंत यांनी सांगितले, ‘तरुण वर्ग या लढाईत उतरल्याने आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे’.
प्रशासनावर दबाव
भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गीते यांनी उपोषणस्थळी येऊन पवार यांची भेट घेतली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, पवार यांनी ठामपणे सांगितले, ‘अधीक्षक अभियंता प्रत्यक्ष येऊन भ्रष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याची घोषणा करेपर्यंत आणि रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घेईपर्यंत हे उपोषण सुरूच राहील.
पुढील दिशा
आंदोलन हा शेवटचा पर्याय नाही; पण मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, प्रशासनाने आता तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निर्णय घ्यावा, अशी जनतेची ठाम मागणी आहे.
पाठिंबा जाहीर करणारे मान्यवर व संघटना
* कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, * ठाणे जिल्हा कोयना संघ, * कोकण विभाग पत्रकार संघ, * स्वाभिमान संघटना : जितेश पाटील, * राष्ट्रवादी काँग्रेस मनोज गुळवी, भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटीचे नीलेश भोईर, * रावण ग्रुपचे भरत जाधव, देवा ग्रुप फाउंडेशनचे तानाजी मोरे, * आर्यन फाउंडेशन, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, दयानंद पाटील, गणेश गुळवी, किशोर जाधव, कैलास देवा जाधव, * महाराष्ट्र बेलदार संघाचे विनोद मोहिते, नागेश जाधव, * शिवसेना (शिंदे गट) : दशरथ पाटील गुरुजी, सचिन पाटील
* काँग्रेस नेते : केशव लाटे, दीपक पाटील, महिला मंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.