नियमांचे उल्लंघन करून प्रभाग रचना

नियमांचे उल्लंघन करून प्रभाग रचना

Published on

नियमांचे उल्लंघन करून प्रभागरचना
प्रकाश भोईर यांनी राज्य निवडणूक आयोगाला हरकती

डोंबिवली, ता. १ : कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते आणि मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लेखी पत्राद्वारे ही हरकत दिली आहे.

भोईर म्हणाले, की शासनाच्या आदेशानुसार प्रभागरचना उत्तरेकडून ईशान्येकडे, नंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा क्रमाने करणे आवश्यक होते. मात्र सध्या करण्यात आलेली रचना या आदेशांचे उल्लंघन असून, ती उंबार्डे, सापार्डे गाव आणि खडकपाडा भागावरून करण्यात आली आहे. ते टिटवाळा/मांडा टिटवाळा या उत्तर भागातील विभागातून होणे अपेक्षित होते. याशिवाय शासन निर्णयानुसार ५.३ परिशिष्टातील नियमांचे उल्लंघन झाल्याचेही भोईर यांनी निदर्शनास आणले. प्रभाग क्रमांक २१, २२, २३, २४ आणि २५ हे प्रभाग डोंबिवली पश्चिमेतील असून, यातील २१ व २५ हे तीन सदस्यीय प्रभाग म्हणून तयार केले गेले आहेत, जे नियमांविरुद्ध आहे.

२४ जून २०२० रोजी २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याचा शासन निर्णय असून, त्यानंतर १८ गावांतील १३ नगरसेवकांची पदे रद्द केली होती; मात्र त्या गावांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश न करता त्यांना समाविष्ट करून प्रभागरचना करण्यात आल्याने नियमांचा भंग झाला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९चे कलम ५(३) व नगरविकास विभागाचा आदेश (एमसीओ - २०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४) दिनांक १० जून २०२५चासुद्धा भंग झाला असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाकडे हरकती नोंदविल्या असून, प्रशासनाने त्या हरकतींवर सुनावणी करण्याऐवजी औपचारिक प्रक्रिया पार पाडण्याचेही टाळल्याचे आरोप केले आहेत. आता प्रकाश भोईर यांनी दिलेल्या हरकतीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

Marathi News Esakal
www.esakal.com