अजून किती बळी घेणार? घोडबंदरवासीयांचा संतप्त सवाल
घोडबंदर रस्त्यावर अपघातांचे सत्र
खड्ड्यांवर प्रशासनाचा तात्पुरता डांबरी मुलामा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : वाघबीळ उड्डाणपुलावर सोमवारी (ता. २९) झालेल्या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघातानंतर प्रशासनाने उड्डाणपुलावरील खड्ड्यांवर तातडीने काम सुरू केले असले तरी, अजून किती बळी घेतल्यानंतर प्रशासन जागे होईल, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
घोडबंदर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी यामुळे गेल्या वर्षभरात तब्बल १७ अपघाती मृत्यू झाले आहेत. सोमवारची घटना ही १८वी शोकांतिकेची नोंद होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मागील पंधरा दिवसांत तीन वेळा आंदोलनही केले, मात्र प्रशासनाचे अद्यापही मौनव्रत आहे.
मेट्रो आणि सेवा रस्त्याच्या कामांचा फटका
मुंबई, ठाणे, वसई आणि गुजरातकडे जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. याशिवाय, सेवा रस्त्यांचे विलीनीकरणाचे कामही रखडले आहे. या कामांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्यात ही स्थिती आणखीनच गंभीर झाली असून, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
अपघातानंतरचा तात्पुरता मुलामा
सोमवारच्या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली असून, मंगळवारी (ता. ३०) वाघबीळ उड्डाणपुलावरील खड्ड्यांवर तात्पुरता डांबरी मुलामा देण्याचे काम सुरू केले. स्थानिक रहिवासी रोहित गायकवाड आणि मनसेचे विभागाध्यक्ष किरण पाटील यांनी घटनास्थळी जाऊन हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बस झाली मुजोरी, आता हवे खड्डेमुक्त रस्ते, अशा शब्दांत आवाहन केले.
न्यायासाठीचा एल्गार
गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत, मात्र त्याकडे प्रशासन आणि राज्यकर्ते दोघांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला, तर दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. आता खड्डे बुजविण्याचे काम अपघातानंतर करणे म्हणजे मृत्यू झाल्यावर औषध देण्यासारखे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.